दिल्ली येथील पंचशील आश्रम, झंडेवालान (रिंग रोड) येथे ४१ वे भारतीय दलित साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात व वैचारिक वातावरणात पार पडले. या द्विदिवसीय संमेलनात देशातील २२ राज्यांतील साहित्यिक, पत्रकार, संशोधक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संमेलनास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी संघप्रिय गौतम, भारतीय दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. सुमनाक्षर, सचिव जय सुमनाक्षर, केंद्रीय मंत्री बबनराव घोलप, राज्यमंत्री यमनकुमार बावरा, पंजाबचे कलेक्टर अभिषेक मुन तसेच भारतीय दलित साहित्य अकादमी विदर्भ प्रदेशाध्यक्ष डॉ. (साहित्यिक) रवी दलाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
संमेलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी जि.प. प्राथ शाळा कुमशेत येथील कवी व लेखक यशवंत घोडे सर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्काराने सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व फेलोशिप फाईल प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याच वेळी डॉ. व्ही. व्ही. पोपेरे (जनरल सेक्रेटरी, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य, नागपूर; देशरत्न पुरस्कार, नीती आयोग भारत सरकार; आदिवासी सेवक, महाराष्ट्र शासन), पुरातत्त्व विभागाचे इतिहास संशोधक रविंद्र शिंदे (धाराशिव), प्रा. नंदकुमार बालुरे (लातूर), जुन्नर तालुक्यातील कवीवर्य रविंद्र भोजने, कवी अशोक उघडे, कवयित्री अलका खोसे आदींसह देशातील २२ राज्यांतील अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
संमेलनाच्या विविध सत्रांमध्ये दलित साहित्य, दलित इतिहास, दलित पत्रकारिता, दलित महिला तसेच दलित समाजाच्या समकालीन प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. सादर झालेल्या शोधपत्रे व प्रस्तावांवर विचारमंथन करून महत्त्वाचे निष्कर्ष मांडण्यात आले.
समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी विचारांचा साहित्याच्या माध्यमातून अधिक व्यापक प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला. ४१ वे भारतीय दलित साहित्य संमेलन हे सामाजिक समतेच्या लढ्याला नवी दिशा देणारे ठरले.



Post a Comment
0 Comments