Type Here to Get Search Results !

किल्ले शिवनेरी येथे एकदिवसीय जिल्हास्तरीय किल्ले संवर्धन कार्यशाळा उत्साहात संपन्न



प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे आणि जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव छत्रपती महाविद्यालय,जुन्नर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक स्थळे दत्तक योजना अंतर्गत एकदिवसीय जिल्हास्तरीय किल्ले संवर्धन कार्यशाळा किल्ले शिवनेरी (शिवजन्मभूमी) येथे आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत दुर्ग वाचन तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर या ठिकाणाहून झाली.दुर्ग वाचनातून किल्ले शिवनेरीचा ऐतिहासिक,सांस्कृतिक व राष्ट्रीय वारसा याबाबत माहिती दुर्गवाचक मा.प्रभाकर भालचिम (दुर्ग अभ्यासक) यांनी सर्व स्वयंसेवकांना दिली.उपस्थित विद्यार्थ्यांना किल्ल्यांचे जतन,संवर्धन व संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.त्यांच्याकडून किल्ल्याचे सर्व दरवाजे,बुरुज,शिवाइ देवी मंदिर,अंबरखाना,लेण्या, पाण्याच्या टाक्या,शिव जन्मस्थान,कडेलोट आदीचा माहिती स्वयंसेवकांना देण्यात आली. 

यानंतर राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबवून प्लास्टिक व इतर कचरा संकलित केला.ऐतिहासिक वारशाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे,असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.किल्ल्याचे दुर्ग वाचन करून साखळ दंड मार्गाने सर्व स्वयंसेवकांना गडावरून खाली आणले.भोजन करून स्वयंसेवकांना प्रमाणपत्र वितरित करून या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. 

कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव वाघमारे आदींनी स्वयंसेवकांचे कौतुक केले.NSS कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे.प्रा.सुप्रिया काळे, प्रा.विष्णू घोडे,प्रा.जयश्री कणसे, प्रा.मयूर चव्हाण यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. तसेच विविध महाविद्यालयांतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments