Type Here to Get Search Results !

रामवाडीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन; महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी मशीनचे लोकार्पण



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर 

जुन्नर: सुवर्णमहोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त डिसेंट फाउंडेशन, पुणे आणि श्रीराम देवस्थान ट्रस्ट, रामवाडी (निरगुडे, जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध आरोग्य तपासण्यांसह महिलांच्या आरोग्यावर विशेष भर देण्यात आला.




या प्रसंगी पोर्टएस्कॅप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीएसआर निधीतून महिलांच्या स्तन कर्करोगाच्या पूर्व तपासणीसाठी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीनचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‘आस्था’ उपक्रमांतर्गत १६७ महिलांची ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी करण्यात आली.



शिबिरादरम्यान मार्गदर्शन करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे यांनी महिलांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील महिला लाज किंवा आर्थिक अडचणींमुळे अनेकदा आजाराकडे दुर्लक्ष करतात. स्तनाचा कर्करोग पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात ओळखल्यास पूर्णपणे बरा होऊ शकतो; मात्र उशिरा निदान झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वेळेत तपासणी करणे अत्यावश्यक आहे.



तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी माहिती देताना त्यांनी १४ वर्षांच्या मुलींना HPV लस घेण्याचे आवाहन केले. ही लस भविष्यातील धोके टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती प्राथमिक आरोग्य केंद्रात विनामूल्य उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.


या शिबिरात विघहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममार्फत रक्तदाब, शुगर, हृदय व मूत्ररोग तपासण्या करण्यात आल्या. माऊली आय केअरच्या माध्यमातून नेत्र तपासणी करून ११७ गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. हिंद लॅबमार्फत रक्त तपासण्या करण्यात आल्या, तर दंततज्ज्ञ डॉ. जागृती ताजने यांनी दंत तपासणी केली.


मान्यवरांची उपस्थिती:

या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, सचिव डॉ. एफ. बी. आतार, डॉ. दयानंद गायकवाड, डॉ. अशितोष बोळीज, डॉ. जागृती ताजने, नेत्रतज्ज्ञ विकास बोन्द्रे, आरोग्य सेवक विवेक अत्रे ,अलका मुंढे ,तपासणी तज्ज्ञ ज्योत्स्ना चतुर, सपना बेलवटे, उज्वला गवळी, छाया पाटील,रेश्मा ढोमसे ,पुजा शिंदे ,रुपाली कुटे,यश शिनगर, मंगेश पवार, मानसी बोळीज, आशा सेविका , तसेच श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश ताजने व इतर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सूत्रसंचालन: दीपाली जेजुरकर

आभार प्रदर्शन: सुरेखा ताजने

Post a Comment

0 Comments