बँकेतील जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाल्यानंतर दादासाहेब पुण्यातील प्रभात रोडवरील एका उच्चभ्रु सोसायटीत वास्तव्यास आलेत.
आज सकाळी त्यांचा धुळ्याचा मित्र, त्यांना भेटायला आला. बरोबर आणलेला पेढ्यांचा बॉक्स त्याने दादासाहेबांना दिला. त्या बॉक्स वरील "चत्रभुज नानजी" नांव बघताच दादासाहेब क्षणात भूतकाळात शिरलेत.
SSC बोर्डाच्या परीक्षेची फी भरण्याचा शेवटचा दिवस होता. मोठ्या कष्टाने जमवलेले पंचवीस रुपये वडिलांनी राजला दिलेत, परीक्षेची फी भरण्यासाठी. काय ते दुर्दैव! राजच्या आईला चक्कर आली. त्यानंतर डॉक्टरांची फी, इंजेक्शन आणि औषधे, पंचवीस रुपये केव्हाच खर्च झालेत.
राजने दोघा-तीघा नातेवाईकांकडे पैसे उसने मागितले परंतु कोणीही पैसे दिले नाहीत. म्हणतात ना, बोलतात सर्व पण गरजेच्या वेळी कोणीही पुढे येत नाही. पूर्णतः रिकामा खिसा. राज मोठ्या खिन्न मनाने शाळेत जायला निघाला.
दगडी शाळेजवळील स्वस्तिक टॅाकीजसमोर, भर रस्त्यात एक टेम्पो थांबला होता. तिथे एका बंगल्याचे बांधकाम सुरू होते. "सिमेंटच्या गोण्या उतरवायला कोणीही मजूर मिळत नाही", टेम्पो ड्रायव्हर अग्रवाल शेठना सांगत होता.
शेठजी, मला पंचवीस रुपये द्या मी सिमेंटच्या गोण्या उतरवून देतो राज म्हणाला. मध्यम उंची, अशक्त प्रकृती पण तरीही अवजड काम करण्याची तयारी.
तू हे काम करू शकशील? विस्मयाने शेठजींनी विचारले.
हो, नक्की करेन म्हणत राजने कामाला सुरुवात सुध्दा केली आणि अर्ध्या तासात टेम्पो रिकामा केला.
घामाघूम झालेल्या राजला शेठजींनी प्यायला पाणी दिले आणि सांगितले हे ३० रुपये घे आणि ५ रुपये मला परत आणून दे.
राजने समोरील दोन-तीन दुकानांत विचारले परंतु सुटे मिळाले नाहीत. ऑफिस बंद व्हायला फक्त अर्धा तास बाकी होता म्हणून राज घाईघाईत शाळेत गेला, परीक्षा फीचे 25 रुपये भरलेत.
मुलगा तसा गरीब आणि प्रामाणिक वाटला, म्हणूनच मी त्याच्यावर विश्वास ठेवला परंतु तो पाच रुपये घेऊन गायब झाला. हल्ली कोणावरही विश्वास ठेवू नये, शेठजी स्वतःशीच पुटपुटले.
पुढच्या १० मिनिटांत राज पळत पळत आला, त्याला धाप लागली होती. माफ करा शेठजी, थोडा उशीर झाला म्हणत, पाच रुपये त्याने शेठजींना सुपूर्द केले. शेठजी शरमलेत, मनातल्या मनात.
शेठजी, तुम्ही मला मदत केली म्हणूनच मला परीक्षेची फी भरता आली, अतिशय कृतज्ञतेने राजने शेठजींना वाकून नमस्कार केला.
SSC परीक्षेचा रिझल्ट लागला. राजला ७२% मार्क्स मिळालेत. २० पैसे घेऊन राज दुकानात गेला पेढे आणण्यासाठी.
काका मला पेढे द्या म्हणत राजने २० पैसे दुकानदाराला दिलेत. काय रे काठावर पास झाला का? दुकानदाराने २० पैशांच्या नाण्याकडे बघत तुच्छतेने विचारले. नाही काका, मला ७२% मार्क्स मिळालेत.
२० पैशात फक्त एकच पेढा मिळेल दुकानदार काका हसत म्हणाले. काका प्लीज मला दोन पेढे द्या ना. एक देवापुढे ठेवायचा आणि दुसरा देवासमान असलेल्या अग्रवाल शेठजींना द्यायचा.
भाऊ, या मुलाला एक किलो पेढे द्या, मागून कणखर आवाज आला. शेठजी, परंतु त्याच्याकडे फक्त २० पैसे आहेत.
१ किलो पेढ्याचे पैसे मी देईन, राजने मागे वळून बघितले, साक्षात त्याचे दैवत, अग्रवाल शेठजी! भरभरून आशीर्वाद आणि चत्रभुज नानजींकडचे १ किलो पेढे देत शेठजी म्हणालेत, मनापासून अभिनंदन आणि यशस्वी भव!
राजने पुढे खुप कष्ट केलेत, प्रतिकूल परिस्थितीत पुढचे शिक्षण घेतले. बँकेत नोकरी मिळवली आणि एका मागोमाग एक प्रमोशन घेत जनरल मॅनेजर पदावरून निवृत्त झाला. प्रत्येक प्रमोशन नंतर राजने अग्रवाल शेठजींना भेटून कृतज्ञता व्यक्त केली.
"अग्रवाल शेठजी" आणि "चत्रभुज नानजी"‘ राजच्या स्मृतिपटलावर कायमचे कोरले गेलेत.
राज, अरे कुठे हरवलास? घे ना हा बॉक्स, पेढे आहेत चत्रभुज नानजींकडचे, दादासाहेबांचा मित्र म्हणत होता.
-दिलीप कजगांवकर, पुणे
७७७००२५५९६

Post a Comment
0 Comments