Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कथा -लेखक दिलीप कजगांवकर लिखित योगायोग कथा



गुड मॉर्निंग मॉम, म्हणत मुग्धाने नेहाला म्हणजे तिच्या आईला जागे केले.

मुग्धा, अगं खूप उशीर झाला का?

मॉम आता फक्त सात वाजताहेत. 

मुग्धा अगं तु आज इतक्या लवकर कशी उठलीस? 

मॅाम आज तुझा वाढदिवस आहे आणि तोही ५१ वा. मुग्धाने सुंदर पुष्पगुच्छ देत नेहाला विश केले. 

चहा, नाश्ता तयार आहे, मुग्धा म्हणाली. 


दिवसाची सुरुवात खूपच छान झाली. कधी नव्हे तो लेकीने बनवलेला स्वादिष्ट नाश्ता आणि वाफाळलेली कॅाफी. कोणती आई खुष होणार नाही?


साधारणतः दहा वाजता नेहाला एका विख्यात कंपनीतून फोन आला, मॅम आमच्या कंपनीतील १०० लोकांचा इंशुरन्स काढायचा आहे, तुम्ही आमच्या ऑफिसला ११ वाजता येऊ शकाल का? ही तर अनपेक्षितपणे आलेली सुवर्ण संधी होती. हो, नक्की येते म्हणत नेहाने कंपनीचा पत्ता आणि इतर माहिती घेतली.


गुलाबी साडी, मॅचिंग ब्लाऊज, हलकासा मेकअप आणि लांब मोकळे केस, नेहा छान दिसत होती. एच आर ऑफिसरने नेहाचे मोठ्या आदराने स्वागत केले. कॅाफी पिता पिता आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या घेऊन १०० लोकांच्या इंशुरन्सचे काम नेहाला दिले.


नेहाने आभार मानायला म्हणून हात जोडले. मॅम, आभार मानायचेच असतील तर माझे नाही आमच्या साहेबांचे माना म्हणत एच आर ऑफिसरने नेहाला दहाव्या मजल्यावरील साहेबांच्या केबिनकडे नेले. 

दहाव्या मजल्यावर संपूर्ण शुकशुकाट, फक्त खूप मोठा कॉन्फरन्स हॉल आणि अगदी टोकाला साहेबांची केबिन होती. तुम्ही इथे बसा, साहेब तुम्हाला बोलावतील, म्हणत एच आर ऑफिसर निघून गेला. 


संपूर्ण शांतता, आजूबाजूला कोणीही नाही, कसलाही आवाज नाही, नेहा मनातून घाबरली होती. एवढा मोठा बिझिनेस देणाऱ्या साहेबांच्या मनात काही बरे वाईट विचार तर नसतील ना? हा विचार येऊन नेहा अजूनच घाबरली. नेहाने पर्स मधून मोबाईल फोन बाहेर काढला आणि गरज पडली तर मुग्धाला पटकन फोन करायचा असे तिने मनोमनी ठरविले. 


साधारणतः पाच मिनिटांनी साहेबांच्या केबिनमधून एक आधुनिक तरुणी बाहेर आली. तुम्हाला साहेबांनी बोलाविले आहे, तिने सांगितले. मी बाहेर येईपर्यंत तुम्ही इथेच थांबा, नेहाने तिला विनवणी केली. साहेबांनी मला एक महत्त्वाचे काम दिले आहे आणि त्यासाठी त्यांनी मला लगेच वकीलांकडे जायला सांगितले आहे म्हणत ती निघून गेली. साहजिकच नेहाची भीती अजून वाढली. 


त्या पूर्ण मजल्यावर एकटीच असलेल्या नेहाने मोबाईल फोन हातात ठेवत घाबरत घाबरतच साहेबांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. आत जाताच नेहा दचकली. ये नेहा, तुझीच वाट पाहत होतो. तुला भेटायला अगदी आतुर झालो होतो. अगदी जवळची ओळख असल्यासारखे चक्क एकेरीत संबोधित साहेबांनी केलेले स्वागत तीला खटकले.


सुटा-बुटातील साहेबांच्या कपाळावर लाल गंध होते आणि केबिनमध्ये गणपतीचा भला मोठा फोटो होता. साहेबांनी उठून नेहाला अदबीने नमस्कार केला. साहेबांची ईश्वर भक्ती आणि नेक वृत्ती पाहून नेहाची भीती सरली.


साहेब आपण एवढा मोठा बिझिनेस मला दिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते, नेहा म्हणाली. आपली ओळख नाही, परिचय नाही तरीही कां केली आपण एवढी मोठी कृपा माझ्यावर? नेहाचा प्रश्न ऐकून साहेब गालातल्या गालात हसलेत. नेहा, ही कोणतीही कृपा नाही, ही आहे केवळ गुरुदक्षिणा! गुरुदक्षिणा? साहेब, मी शिक्षिका नाही किंवा प्रोफेसरही नाही. तुमचा काही गैरसमज तर होत नाही ना? 


मी कोणत्याही वर्गात तुझ्याकडून शिकलो नाही हे बिलकुल सत्य आहे, परंतु एका स्पर्धेच्या ठिकाणी मी तुझ्याकडून शिकलो. ३० वर्षांपूर्वी एका वादविवाद स्पर्धेत बोलताना माझ्याकडून एक चूक झाली होती, ती चूक नेमकी माझ्यानंतरची स्पर्धक नेहा जोशीने म्हणजे, तू पकडलीस आणि माझे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हिरावून घेतलेस. नेहा आठवतंय का तूला? 

नेहाने थोडा विचार केला. साहेब, नाही लक्षात येत. मी जे सांगतोय ते नीट ऐक, बघ आठवतंय का? लक्स इंटरनॅशनल ला मी लक्स इंटर्नल म्हणालो होता. माझी ती चूक हायलाइट करताना तू म्हणालीस, ज्यांना साबणाचे नांवही माहित नाही .......

आणि स्पर्धा संपल्यानंतर रेल्वे स्टेशनला जाताना एका दुकानातून लक्स इंटरनॅशनल साबण विकत घेऊन तू मला भेट दिला होता, आणि म्हणाली होतीस, आता लक्षात राहील ना साबणाचे नांव? हो हो आठवलं आता. मला नंतर राहून राहून वाटले की मी जरा जास्तच केलं तेव्हा. काही क्षण ते दोघेही भूतकाळात शिरलेत.


सर, मी तर तुमचे बक्षिस हिरावून घेतले होते आणि तुम्हाला साबण देऊन अपमानित सुध्दा केले होते.

तरीही तुम्ही माझा बदला न घेता, मला एवढा मोठा बिझिनेस दिलात? शिक्षा करण्याऐवजी चक्क बक्षिस?


नेहा मला बक्षीस मिळाले नाही, परंतु तु दाखविलेल्या चुकीतुन मी खुप काही शिकलो, छोटीशी चूक किती महागात पडते हे मला समजले. त्याचा मला आयुष्यात सदैव उपयोग झाला. मी परफेक्शनिस्ट झालो आणि एक मोठी कंपनी उभारू शकलो, म्हणूनच ही छोटीशी गुरुदक्षिणा! 


कळत नकळत कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी चांगलं करतं आणि  ते करणारी व्यक्ती जेव्हा अपरिचित असते तेव्हा त्या व्यक्तीचं महत्त्व हे 

अनमोल असतं आणि म्हणूनच ती व्यक्ती आपल्याला परत भेटावी, आपण निदान तीचे आभार मानावेत असे आपल्याला मनापासून वाटते. म्हणूनच मी तुला शोधायचा बराच प्रयत्न केला. फोनवर बोलताना नेहा नांव ऐकल्यावर, आपण पूर्वाश्रमीच्या नेहा जोशी का? असे विचारून मी अनेक जणींचा रोष ओढवून घेतला. खरं तर कंपनीच्या इनॅागरेशनला मला तुला बोलवायचे होते. मी जवळ जवळ महीनाभर तुझा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला, अगदी लिंक्ड इन, फेसबुक, गुगल वरही, पण मला यश मिळाले नाही.


सर पण एक प्रश्न मात्र आहे. त्या स्पर्धेनंतर आपण आज प्रथमच भेटलो. लग्नानंतर माझे आडनांव बदलले. मग तरीही ३० वर्षांपूर्वी तुम्हाला भेटलेली तेव्हाची नेहा जोशी ही आताची नेहा गोखले हे मला न भेटताच तुम्हाला कसे समजले?


नेहा तो निव्वळ योगायोग होता. मागच्या महिन्यात एका वादविवाद स्पर्धेसाठी मला परिक्षक म्हणून बोलावले होते. तिथे एका स्पर्धकाला बघितल्यावर मला तुझी आठवण आली. तुला ३० वर्षांपूर्वी बघितले अगदी तशीच होती ती मुग्धा गोखले. मुग्धाने पहिला नंबर पटकावला. मी तीचे अभिनंदन करताना तीची विचारपूस केली त्यावेळी तीने सांगितले की वादविवाद, वक्तृत्व हे गुण तीने आईकडून घेतले. तिच्या आईने देखील कॉलेजला असताना अनेक वादविवाद स्पर्धांमध्ये बक्षीसे पटकावली होती.


तुझ्या आईचे लग्नाआधीचे नांव नेहा जोशी होते का? मी अधीरतेने विचारले. होकारार्थी मान हलवत तीने विचारले, अय्या, तुम्ही आईला ओळखतात? आणि ते कसे? मी मुग्धाला आपल्या ३० वर्षांपूर्वीच्या भेटी विषयी सर्व काही थोडक्यात सांगितले.


अनेक वर्षांपासून जिला मी शोधत होतो त्या नेहाचा शोध अनपेक्षितपणे लागला. मुग्धाकडून तुझा नंबर, तुझ्या इंश्युरन्स व्यवसायाची माहिती आणि वाढदिवसाची तारीख मिळाली. आईला काहीही सांगु नकोस हे तीला आवर्जून सांगितले आणि तीनेही ते आनंदाने मान्य केले. 


राजची स्मरणशक्ती, आत्मीयता, प्रेम आणि आदर बघुन नेहाचे डोळे पाणावलेत. तुम्ही खूप ग्रेट आहात सर, नेहा भारावून म्हणाली. तुमचे मनापासून आभार म्हणत नेहाने हस्तांदोलनासाठी पुढे केलेला हात राजने मोठ्या आदराने हातात घेत प्रेमाने थोपटला.


राज सर, एक गोष्ट मागू? बिनशर्त, राज म्हणाला. मुग्धाचे ग्रॅज्युएशन आता यावर्षी पुर्ण होईल. तीला तुमच्या कंपनीत नोकरी मिळेल का? मुग्धा खूप हुशार आहे, सुंदर आहे, मेहनती आहे पण खूप साधी सरळ आहे. तीने ओळखीच्या ठिकाणी नोकरी केली तर माझी काळजी कमी होईल म्हणत नेहाने मुग्धाचा बायोडेटा राजकडे दिला. 


राजने एच आर ऑफिसरला बोलावून सांगितले, या मॅम माझ्या ओळखीच्या आहेत. हा मुग्धा म्हणजे, त्यांच्या मुलीचा बायोडेटा. मुग्धाशी बोला आणि चांगला रोल, पोझिशन आणि पगार अॅाफर करा. हो सर, म्हणत एच आर ऑफिसर निघून गेला.


राज सर, आजही मला तुमची एक चूक दाखवायची आहे. 

बोला गुरुवर्य, राज म्हणाला. 

"या मॅम माझ्या ओळखीच्या आहेत" असे सांगण्याऐवजी, "ही माझी जुनी मैत्रीण आहे" असे तुम्ही सांगायला हवे होते. 

हो, अगदी बरोबर, माझी चुक मान्य, नेहा. 

मलाही तुझी एक चुक दाखवायची आहे, राज म्हणाला. 

आता मात्र दचकायची वेळ नेहावर होती. 

मी राज सर नाही, तर फक्त राज, तुझा मित्र.

दोघेही खळखळून हसलेत. 


कधी काळची छोटीशी भेट कायम स्मरणात ठेवून, उशीरा का होईना, पण अशक्यप्राय शोधात यशस्वी झालेल्या राजचा नेहाला मनापासून आदर आणि अभिमान वाटला. मोठा बिझिनेस, मुग्धाची नोकरी नी राजची निस्वार्थी मैत्री अशी वाढदिवसाची त्रिवेणी भेट घेऊन नेहा घरी परतली. 


मुग्धाने आईच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. नेहाने केक कापला. मुग्धाची सूचना - आई डोळे मीट, हं आता केक खा, डोळे उघड आता, आणि काय ते आश्चर्य! मुग्धा केक भरवत असतानाचा तो क्षण राज त्याच्या कॅमऱ्यात टिपत होता. राज, तू इथे? नेहा आश्चर्यचकित झाली.


आई, ही पार्टी मी नाही तर राज सरांनी आयोजित केली आहे. मुग्धा तू मला किंचितही थांगपत्ता लागू दिला नाहीस. आई, सरांची तशीच सूचना होती ना, नाईलाज होता माझा. आजचा दिवस अविस्मरणीय ठरला मुग्धा, राज आणि नेहासाठी. 


लग्नानंतर मुलींचे आडनांवच नव्हे तर कधी कधी नांवही बदलते आणि असे असताना अगदी थोडा वेळ भेटलेल्या आणि फक्त नांव माहीत असलेल्या नेहाचा अथांग जनसागरातुन तब्बल ३० वर्षांनी शोध लागणे हा निव्वळ योगायोगच नव्हे काय?

          शोधतसे मी सदैव तुजला

          अन शोध अचानक तुझा लागला.

अथांग सागरात कधीकाळी भेटलेल्या दोन ओंडक्यांची पुन्हा गाठ व्हावी, अगदी तसाच, अशक्यप्राय, निव्वळ योगायोग!


-दिलीप कजगांवकर, पुणे

७७६००२५५९६

Post a Comment

0 Comments