Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कथा - लेखक दिलीप कजगांवकर लिखित आण्णा कथा.



राज आणि रीना एक उच्च-मध्यमवर्गीय कुटुंब. नेहा ही त्यांची एकुलती एक मुलगी, पंधरा वर्षांची. नेहा म्हणजे सौंदर्य, आधुनिकता आणि सोज्वळता यांचा सुरेख संगम. मागच्याच वर्षी राजची पुण्याला बदली झाली. कंपनीने एका मोठ्या सोसायटीत राजला राहण्यासाठी बंगला दिला. राजच्या बंगल्याच्या डाव्या बाजूला दोन मोकळे प्लॅाट आणि उजव्या बाजूला झाडांच्या गर्दीत लपलेला विनायकरावांचा "समृद्धी" हा टुमदार बंगला.


विनायकराव उर्फ आण्णा हे सेवानिवृत्त शिक्षक. मुलगा आणि सून परदेशात, भल्या मोठ्या बंगल्यात विनायकराव एकटेच. फावल्या वेळात, म्हणजे आण्णांचा तसा सर्व वेळच फावला असायचा, नेहाला शिकविणे हा त्यांचा रोजचाच उपक्रम. हळूहळू ते नेहा,राज आणि रीना यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनले.


मागच्या आठवड्यात राज आणि रीनाला काही कामासाठी  बाहेरगावी जायचे होते. नेहाच्या सोबतीला तिची मावशी येणार होती परंतु अचानक पायाला दुखापत झाल्यामुळे मावशी येऊ शकली नाही. नेहाची जबाबदारी मोठ्या आनंदाने आण्णांनी स्वीकारली.


आज सकाळीच राज आणि रीना परतलेत. नेहा थोडीशी अबोल आणि नाराज असल्याचे राज आणि रीना या दोघांच्या नजरेतून सुटले नाही. कदाचित आज रीनाचा रिझल्ट आहे आणि त्याचे टेन्शन तिला आले असणार असे दोघांनाही मनोमनी वाटले.


नेहाला ९०% मार्क्स मिळालेत. अभिनंदनाचे अनेक फोन आलेत, बरीच मंडळी अभिनंदन करण्यासाठी घरी आली. आले नाहीत ते फक्त आण्णा. त्यांच्या घराला कुलूप होते. इतके मार्क्स मिळाले तरी नेहा अजूनही नाराज होती, तिच्या नाराजीचे कारण राज आणि रीनाला समजत नव्हते. आज तीने नीट जेवणही केले नव्हते. 


रात्री न राहवून राजने नेहाला विचारले, नेहा बेटा तु नाराज का? काय झाले? नेहा गप्प गप्पच. बोल बेटा बोल, काहीतरी बोल. राज नेहाला विनवत होता. नेहाने आईला हाक मारली. मला तुम्हाला दोघांना काहीतरी सांगायचे आहे, नेहाला प्रथमच आवाज फुटला होता. 


नेहाने जे सांगितले ते अकल्पित आणि धक्कादायक होते. परवा रात्री ८ वाजता आण्णांचा फोन आला. नेहा, मी तुझ्या आवडीचा पिझ्झा मागवला आहे, पिझ्झा खायला ये. पाचच मिनिटांनी पुन्हा फोन आला, नेहा लगेच ये, पिझ्झा आलाय, मी वाट पाहतोय.


मी घाईघाईत, चेंज न करता तसेच गेले, शॅार्ट नी स्लीवलेस टी शर्टवर. आम्ही दोघांनी पिझ्झा खाल्ला. नेहा, आज तु खुप छान दिसतेस, एकदा नव्हे दोन-तीनदा आण्णा म्हणालेत. नेहा चेस खेळणार का? हॅाल खेरीज इतर लाईट बंद करत आण्णांनी विचारले. चेसचा डाव छान रंगला, गप्पा गोष्टी चालूच होत्या.


अचानक आण्णांचा फोन वाजला. आण्णा दहा मिनिटे फक्त ऐकत होते. ठीक आहे, तु सांगितल्याप्रमाणे करतो, एवढेच ते बोलले आणि त्यांनी फोन ठेवला.


आमचा चेसचा खेळ सुरूच होता परंतु आण्णांचे त्यात फारसे लक्ष नव्हते. नेहा, आपण  कोक पिऊया का?

मी नाही म्हटले तरी आण्णांनी कोक आणला. मला पूर्ण ग्लास दिला पण त्यांनी स्वतः मात्र अगदी थोडाच घेतला. कोक घेतल्यावर आम्हा दोघांना तरतरी आली, खेळ छान रंगला आणि तोच अचानक लाईट गेलेत, सर्वत्र काळोख पसरला. प्रचंड शांतता, आवाज होता तो फक्त वाऱ्याचा.


मी म्हटले, आण्णा मी घरी जाते पण आण्णांनी माझ्या  खांद्यावर थोपटत मला समजावले की एवढ्या अंधारात मी त्यांच्या घरीच सुरक्षित आहे. लाईट आल्यावर मी तुला घरी सोडतो.


आणि अचानक ....... म्हणत नेहा थांबली. नेहाला हुंदके आवरत नव्हते. बोल नेहा बोल. घाबरू नकोस. राजने नेहाला धीर दिला. आपण नेहाला उगीचच एकटे सोडले, राज आणि रीनाला पश्चात्ताप होत होता.


आण्णांनी टॉर्च लावला आणि ....... नेहाला बोलवले जात नव्हते.


टॉर्चच्या प्रकाशात ....... बोलताना नेहा क्षणभर थांबली. बोल नेहा, जे काही घडले ते सांग पटकन, राज म्हणाला.


टॅार्चच्या प्रकाशात मला आण्णांच्या डोळ्यात अश्रू दिसलेत. काय झाले आण्णा? मी आण्णांच्या अगदी जवळ जाऊन विचारले. छे, छे काही नाही आण्णांनी सावरासावर केली. मी हट्टाला पेटले. 


मग पुढे काय झाले? बोल, बोल. राज आणि रीनाला धीर धरवत नव्हता. 


माझ्या मुलाने हे घर विकले आहे आणि पुढच्याच आठवड्यात मला वृद्धाश्रमात राहायला जायचे आहे, थोड्या वेळापूर्वी जो फोन आला तो त्याचाच होता, आण्णांनी सांगितले. 


एवढेच ना नेहा, राज आणि रीनाचा जीव भांड्यात पडला.


 तेवढ्यात आण्णांच्या बंगल्याचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. राजने आण्णांना बोलावले. 


आण्णा या वीकेंडला आम्ही तुमच्याकडे राहायला येतोय, राज म्हणाला. बेटा, या वीकेंडला तर मी हे घर सोडून खूप दूर राहायला जाणार आहे कायमचा, आण्णा म्हणालेत.


आम्हीही घर बदलणार आहोत. राजच्या या बोलण्याने आण्णा आणि नेहा दोन्हीही दचकलेत. काय? कधी, कुठे? नेहाने मोठ्याने विचारले.


काही दिवसांपूर्वी बंगला विकायचा आहे म्हणून एका एजंटने जाहीरात दिली होती. चौकशी केल्यावर मला समजले, तुमचाच बंगला विकायचा आहे. गेले आठ दिवस मी गावाकडे गेलो होतो. पैशांची जुळवाजुळव केली आणि तुमचा बंगला "आमच्यासाठी" नव्हे पण "आपल्यासाठी" खरेदी केला.


आता तुम्ही आणि आम्ही एकत्र राहू. मला वडील मिळालेत आणि नेहाला आजोबा. आण्णांच्या आणि नेहाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. आण्णा राजच्या आणि नेहा आईच्या मिठीत होती.


रक्तातील नात्याच्या निष्ठुरतेवर, मानलेल्या नात्यातील ओलाव्याने विजय मिळवला होता. आण्णा आता एकटे नव्हते, संपूर्ण कुटुंब त्यांच्या बरोबर होते. त्यांच्या जगण्याच्या नष्ट झालेल्या ईच्छेला पुनश्च पालवी फुटली होती. आता त्यांना राजची आणि रीनाची प्रगती पहायची होती, नेहाला खुप शिकवायचे होते. खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन जगायचे होते, "समृद्धी" बंगल्यात.


 - दिलीप कजगांवकर, पुणे

    ७७७००२५५९६

Post a Comment

0 Comments