Type Here to Get Search Results !

समर्थ गुरुकुल मध्ये रंगला भोंडल्याचा कार्यक्रम.

 


समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये नुकताच शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त संकुलातील महिलांनी भोंडल्याचा कार्यक्रम साजरा केला.

सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा भोंडला अनादी काळापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम करतो.

समर्थ गुरुकुलच्या प्रांगणात मधोमध हत्तीची प्रतिमा काढून त्याची पूजा करत फेर धरून ऐलमा पैलमा, कारल्याचा वेल,श्री कांता कमल कांता अशा वैविध्यपूर्ण गाण्यांनी भोंडला खेळ खेळण्यात आला.

भोंडल्या विषयी माहिती सांगताना माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके म्हणाल्या की आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते त्या दिवसापासून हदग्याची किंवा भोंडल्याची सुरुवात होते.भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे.नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.भोंडल्याची विविध गाणी मुखोद्गत असल्याने त्यांच्या मुखातून सुंदर चालीसह ती गीते ऐकताना उपस्थित महिला व विद्यार्थी-विद्यार्थिनी तल्लीन झाल्या होत्या.हादग्याचा फेर धरण्यापूर्वी मध्यभागी पाटावर हत्ती ची रांगोळी काढून त्याच्याभोवती सजावट केली गेली व सहभागी झालेल्या महिला व विद्यार्थिनी त्या हत्तीला नमस्कार करून भोंडल्याच्या खेळात सहभागी होत होत्या.

गुरुकुलच्या शिक्षकांनीदेखील भोंडल्याची पारंपारिक गाणी म्हणत विद्यार्थ्यांबरोबर फिरत भोंडल्याचा आनंद लुटला.ठेका,ताल,लयबद्ध अशा आनंदी व उत्साहाच्या वातावरणात भोंडल्याचा खेळ चांगलाच रंगला आला होता.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सांस्कृतिक विभागा मार्फत स्नेहल ढोले,रूपाली भांबेरे वैशाली सरोदे तसेच इतर सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,सारिकाताई शेळके,ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई आहेर,मीराताई शेळके,संगीताताई शेळके, गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि  विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली सरोदे यांनी तर आभार शाळेचे पर्यवेक्षक सखाराम मातले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments