प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
सातवाहन काळात लोकवस्ती असलेल्या स्थळाच्या भागातून मानवी शरीर स्वच्छतेचे " वज्री " साधन लेण्याद्री जवळील गोळेगांव पांढरीच्या टेकडीवर आढळून आले असल्याचे इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हाणे , यांनी सांगितले. ताम्हाणे म्हणाले की, जुन्नर जवळील कुकडी नदीच्या उत्तरेकडील प्राचीन काळातील पांढरीच्या टेकडीवर भाजलेल्या मातीच्या खापरापासून खरखरीत कठीण अशी मानवी शरीर स्वच्छतेची " वज्री " आढळून आलेली आहे.
जुन्नर परिसरातील सातवाहन काळात मानवी शरीराच्या अंगावरचा मळ काढण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण " वज्री " वापरली जात असत. आंब्याच्या आर्धा कापलेल्या कोई सारख्या आकारातील " वज्री " वर स्पंज सारखी उथळ छिंद्र खरखरीत स्वरूपात पाडण्यात आलेली असून अशा प्रकारच्या " वज्रीने " मानवी शरीराचे अंग घासल्यावर त्या वज्रीच्या खरखरीत छिंद्रा मधील खाचात अंगावरील मळ बसून अंग स्वच्छ निघत असे. लेण्याद्री जवळील गोळेगांव पांढरीच्या टेकडीवर आढळून आलेली खापराची खरखरीत " वज्री " ही हातात घट्ट धरता यावी ह्यासाठी वरील बाजूच्या मध्यभागी साधारणपणे उंच खाचेची सोय असून काही ठिकाणी मिळालेल्या वज्रीच्या माथ्यावर छिंद्र पाडून त्यातून दोरा घालून ती खरखरीत " वज्री " हातात घट्ट धरता यावी अशी सोय केल्याची आढळून येते.
अशा प्रकारच्या चौकोनी, आयत, आंब्याच्या आर्धा कापलेल्या काई सारख्या, नागमोडी खाचा - उथळ छिंद्र असलेल्या "वज्रा"
नासिक, नेवासे, कोशांबी, मधुरा, मोहेंजोदडो, महाराष्ट्रातील इतर ठिकाणाच्या उत्खननात आढळलेल्या आहेत. लेण्याद्री येथे कोरलेल्या लेणी विहारात " कपिचित " नावाचा एक भिक्खू संघ निवास ( वर्षावास ) करीत होता. त्यांच्या भिक्षेसाठी निर्वाहासाठी आश्रय देणाऱ्या लोकांच्या वस्त्या लेण्याद्री जवळील गोळेगांव येथील पांढरीच्या टेकडीवर होत्या. लग्न समारंभात खापरी वज्रीचा उपयोग मानाची देणगी साठी केल्याची प्रथा आजूनही काही ठिकाणी आढळून येते. आजकाल वापरण्यात येणाऱ्या " वज्रा " रबरी स्पंजांची ही प्राचीन आवृत्ती म्हणावयास हरकत नाही. अशा प्रकारे प्रसाधन परंपरा किती प्राचीन आहेत हे आपल्या लक्षात येते असे , बापूजी ताम्हाणे म्हणाले.
-- बापूजी ताम्हाणे, गोळेगांव - लेण्याद्री
ता. जुन्नर, जिल्हा पुणे ( महाराष्ट्र )
Post a Comment
0 Comments