Type Here to Get Search Results !

शिरूर : मलठण एक ऐतिहासिक ठिकाण.....

 


शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका आणि शिरूर तालुक्यातील मलठण हे अतिशय सुंदर व ऐतिहासिक गाव खरोखर छान आहे.

मागील आठवड्यात मी व माझी पत्नी शितल आम्हाला या ठिकाणी जाण्याचा योग आला तो सुरेश गायकवाड यांच्यामुळे, आमच्या साप्ताहिक उद्याचा शिलेदार या नविन शिरूर आवृत्तीचे संपर्क कार्यालय या ठिकाणी झाले व त्याच्या उदघाटन प्रसंगी आम्ही या गावी गेलो होतो, जुन्नर वरून जळवंडी शिरूर बस असते याच बसने आम्ही शनिवारी २१ तारखेला गेलो होतो, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ तारखेला कार्यक्रम होता. साधारण जुन्नर ते शिरूर तीन ते साडे तीन तासाचं अंतर आहे.

येथे पोहोचल्यावर पत्रकार असल्याने नजर शांत बसू देत नव्हती सुरेश गायकवाड यांच्या दुकानातून त्यांनी आम्हा दोघांना हॉटेलमध्ये नाश्त्याला नेलं. नंतर आम्ही गाव फिरत बसलो, गावाला अतिशय छान वेस आहे, वेशीतून आत गेल्यावर डाव्या बाजूलाच मल्लिकार्जुन देवाचे शिव मंदिर आहे, पुढे गेल्यावर जुन्या पद्धतीची घरे व बाजारपेठ व दुकाने दिसली. थोडं आत गेल्यावर महादेवाचे मंदिर व प्रशस्त मैदान आहे याच मंदिराच्या शेजारी बसायला छान असा ओटा होता तिथेच आम्ही बसलो समोरच शाळा होती लहान मुलं खेळत होती त्यातील काहींना या गावाविषयीं माहिती विचारली व पाहण्यासारखं या भागात काय आहे असं विचारलं असता त्यांनी राजवाडा पाहण्यासारखा आहे असं सांगितल. आम्ही वाड्याच्या दिशेने गेलो वाड्याच्या वेशीत एक कर्मचारी होता त्यांना माहिती विचारली तेव्हा ते म्हटले आत जाता येत नाही मग आम्ही बाहेरूनच पाहणी केली व अशीच गावातील काही लहान मुलं व बुजुर्ग लोकांकडून माहिती घेतली, तेव्हा समजलं 

सरदार श्रीमंत धैरशीलराजे पवार घराण्याचा सुंदर सुस्थितीत या ठिकाणी ३०० वर्षांपूर्वीचा राजवाडा आहे. राजवाड्यात सुंदर वैभवशाली छोटे मंदिर आहे, राजवाड्यात एक ऐतिहासिक विहीर आहे. विशेष म्हणजे या विहिरीमध्ये बारा दरवाजे कमानीयुक्त आहे. महाशिवरात्रीला गावामध्ये दोन दिवस मोठी यात्रा भरत असते. या गावाच्या पश्चिमेस आणि पूर्वेस छोटी मोठी तलाव आहेत. मलठण हे गाव शैक्षणिकदृष्टया प्रगत असून स्वातंत्र्य पूर्व काळापासूनच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा असून त्यांच्या इमारती देखील सुंदर आहेत . गावाच्या चहूबाजूने छोट्या टेकड्या असून त्या पावसाळ्यात हिरवळीने सुंदर दिसतात, या गावातील ग्रामपंचायत अतिशय छान व रस्त्याच्या कडेला असल्यामुळे आपले लक्ष लगेच तिथे केंद्रित होते, गावात केंद्र व राज्य स्तरावर नोकरीला असलेले बरेच अधिकारी आहेत, गावातील ग्रामपंचायत येथे सुसज्ज असे वाचनालय आहे.

अतिशय छान गाव आहे. 


लेखन - प्रा. सतिश शिंदे

Post a Comment

0 Comments