Type Here to Get Search Results !

आपटाळे बीटस्तरीय प्राथमिक शिक्षक आरोग्य तपासणी एक सुत्य उपक्रम



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )

आज बुधवार दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी पंचायत समिती जुन्नर अंतर्गत शिक्षण विभागातील आपटाळे बीट व डिसेंट फाउंडेशन पुणे अंतर्गत डोके हॉस्पिटल नारायणगाव, श्री हॉस्पिटल आळेफाटा, हिंद लॅब जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आपटाळे बीटस्तरीय प्राथमिक शिक्षकांची आरोग्य तपासणी शिबिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे आयोजित करण्यात आले.

शिबिर उद्घाटन प्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई, संस्था सचिव एफ.बी.आतार, संस्था संचालक आदिनाथ चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी कुळमेथे, डॉ. अमेय डोके, शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख सुरेश भवारी, पुष्पलता पानसरे, संतोष चिलप, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष शेटे, सामाजिक कार्यकर्ते बन्सी चतुर, सरपंच नीता घोगरे, सदस्य अंकुश चव्हाण, सुनील गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संचिता अभंग यांनी सांगितले की, आपल्या दैनंदिन व्यापात नकळतपणे आपल्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो.त्यामुळे काही शारीरिक व्याधी जडतात. ह्या व्याधींचे रूपांतर मोठ्या आजारांमध्ये होताना दिसते. या पार्श्वभूमीवर आधारित आपल्या बीट मधील सर्व प्राथमिक शिक्षकांची आरोग्य तपासणी करण्याची संकल्पना सुचली आणि डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या मदतीने ती साकार झाली याचा मनस्वी आनंद होत आहे. 

ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या, देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांसाठी आपटाळे बीट प्रमाणे संपूर्ण जुन्नर तालुक्यात पंचायत समितीच्या सहकार्याने हा आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबविणार असल्याचे जितेंद्र बिडवई यांनी यावेळी सांगितले .

आपटाळे बीटअंतर्गत उच्छिल, इंगळून, आपटाळे व तांबे या चार केंद्रातील एकूण 84 शिक्षकांची मोफत आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. आस्था कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती, हृदयरोग, मूत्ररोग, बीपी, शुगर व रक्तातील विविध तपासण्यांचा यात समावेश होता. मंगेश साळवे प्रयोगशाळा समन्वयक , सपना बेलवटे तपासणी तज्ञ व संतोष शिंदे यांनी शिबिर समन्वयक म्हणून कामकाज पाहिले. 

प्राथमिक शिक्षकांसाठी प्रथमच असा आरोग्यविषयक उपक्रम राबविला जात असून या उपक्रमाचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षक संघटनांकडून विशेष कौतुक केले जात आहे. 

आपटाळे बीटसह जुन्नर तालुक्यातील विविध शिक्षक संघटना पदाधिकारी सुभाष मोहरे,बाळासाहेब लांघी, रमेश सावळे, रमाकांत कवडे,भरत बोचरे, अन्वर सय्यद, सचिन नांगरे, विठ्ठल जोशी, पूनम तांबे,प्रभाकर दिघे,अनिल कुटे,संतोष पाडेकर, अंबादास वामन,संदीप थोरात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळेचे मुख्याध्यापक खंडेराव ढोबळे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत सुनिल डोळस व मंगल मरभळ यांनी केले. पंढरीनाथ उतळे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments