Type Here to Get Search Results !

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा निवृत्ती



काकू कसली काळजी करतात? घरात प्रवेश करताच नेहाने विचारले. नेहा अगं, राज म्हणजे तुझे काका एक तारखेला घरात खूप कमी पैसे आणतात. ते कशावर एवढा खर्च करत असतील याचा मी विचार करत होते आणि या आठवड्यात तर मला धक्काच बसला. अगं गेले दोन-तीन दिवस ते चक्क पिऊन येताहेत घरी, कसाबसा स्वतःचा तोल सांभाळत.


काकू, राज काका कोणत्या कंपनीत काम करतात? नेहाने विचारले. अगं टिळक रोडवर, एस पी कॉलेज जवळच्या भाटिया इंटरनॅशनल कंपनीत काम करतात ते. काका कधीपासून काम करतात तिथे? अगं सहा महिन्यांपूर्वी ते निवृत्त झालेत, त्यानंतर चार महिने घरीच होते आणि गेल्या दोन महिन्यांपासून या कंपनीत लागलेत. एवढी मोठी कंपनी पण खूपच कमी पगार देतात असं ते मला सांगतात, परंतु माझा बाई त्यांच्यावर विश्वासच नाही. ते नक्की बाहेरच पैसे उडवत असतील.


टेबलवरील फोटो पाहून नेहाने विचारले, काकू हे कोण? अगं हेच की तुझे काका. हो पण तू कशी ओळखणार त्यांना? तू प्रथमच तर आलीस आमच्या घरी. तुझ्या आईची आणि माझी ओळखच तर मागच्या महिन्यात झाली.


गेले दोन आठवडे नेहा भाटिया इंटरनॅशनल कंपनीत ऑडिटसाठी जात होती. तिने राज काकांना कंपनीत कधीच बघितले नव्हते. एवढेच काय पण भाटिया इंटरनॅशनल कंपनीत ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणीही एम्प्लॉयी नव्हता शिवाय कंपनीत एकही व्यक्ती कॉन्ट्रॅक्टवर नव्हती. असे असताना राज काका या कंपनीत दोन महिन्यांपासून काम करतात हे कसे शक्य आहे?


काका सकाळी ऑफिसला किती वाजता जातात आणि केव्हा परत येतात? नेहाने विचारले. ते सकाळी बरोबर नऊ वाजता घरातून निघतात आणि संध्याकाळी साडेसहा वाजता घरी परत येतात. येईन मी कधीतरी काकांना भेटायला म्हणत नेहाने काकूंचा निरोप घेतला. 


दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे नऊ वाजताच नेहा काकूंच्या घराच्या जवळ येऊन थांबली. बरोबर नऊ वाजता काका घराबाहेर पडलेत. नेहाही काकांच्या मागे मागे गेली. साधारणतः अडीच किलोमीटर चालल्या नंतर भाटिया इंटरनॅशनल कंपनीसमोरील सिटी लायब्ररीत काका गेलेत. नेहा चालून चालून थकली होती. 


गुड मॉर्निंग काका म्हणत लायब्ररीयनने काकांचे स्वागत केले. लायब्ररीतील एका कोपऱ्यात जाऊन पुस्तके चाळताना नेहाचे लक्ष काकांवरच होते. थोड्या वेळाने एक कॅालेजकन्या आली आणि तिने काकांना एक फाईल दिली. त्यानंतर आलेल्या दोन-तीन मुला-मुलींनी देखील काकांना फाईल्स दिल्यात. काका कॉम्प्युटरवर टाईप करण्यात मग्न होते. 


साधारणत: एक वाजता काका लायब्ररीतून बाहेर पडलेत. बहुतेक ते जेवायला जात असतील असे म्हणत नेहा देखील त्यांच्या मागे गेली. बाजूच्या दुकानातून काकांनी पाच रुपयांचा बिस्कीटचा पुडा घेतला. बिस्किटे खाऊन ते लायब्ररीत परतलेत आणि टायपिंग करण्यात मग्न झालेत. थोड्यावेळाने नेहा काकांजवळ गेली आणि तिच्या डब्यातील एक पराठा तिने काकांना देवू केला. नको बेटा, आत्ताच तर भरपेट जेवण केले. काका काय करताहेत तुम्ही? प्रॅाजेक्ट रिपोर्ट टाइप करून मला कॅालेजच्या मुला-मुलींना ईमेल करायचे आहेत, त्यांचा उद्या सबमिशनचा शेवटचा दिवस आहे.


थोड्यावेळाने आलेला चहा नेहाने काकांना आग्रहाने दिला. चहा पिता पिता नेहाला काकांकडून समजले ते असे -

३५ वर्षे प्रायव्हेट कंपनीत नोकरी करून काका निवृत्त झालेत. ग्रॅच्युईटी आणि प्रॉव्हिडंट फंडाचे मिळालेले २० लाख ते फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवणार होते त्याच दिवशी काकूंचा भाऊ वरद आला. दोन महिन्यांत २० लाखांचे ३० लाख करून देतो असे त्याने दाखविलेले अमिष काकांना पटले नाही परंतु काकूंच्या आग्रहपुढे काकांचे काहीही चालले नाही. दोन महिन्यांनी वरदने शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले, तुमच्या २० लाखाचे २ लाख झालेत असे म्हणत काकांना २ लाख रुपये दिले. 


माझा भाऊ किती प्रामाणिक! दुसरा कुणी असता तर २ लाख रुपये त्याच्या कष्टाचा मोबदला म्हणून ठेवून घेतले असते असे म्हणत काकूंनी लाडक्या भावाच्या घोडचुकीवर पांघरूण घातले.


आधीच सोय करून ठेवल्यामुळे काकांना १५ हजार रुपये महिन्याला मिळत होते परंतु काकूंच्या खर्चिक स्वभावामुळे ते त्यांना पुरेसे पडत नव्हते. मागच्या महिन्यात तर काकूंनी कमालच केली त्यांच्या बहिणीसाठी त्यांनी चक्क आठ हजार रुपयांची साडी घेतली. भावाच्या मुलाला फरसाण घेऊन देते असे म्हणत त्यांनी मिठाई, फरसाण आणि ड्रायफ्रूट्स घेत बाराशे रुपये उडवले. काकांची नोकरी चालू असताना हे सर्व परवडत होते परंतु आता हे आपल्याला परवडत नाही याची यत्किंचितही जाणीव काकूंना नव्हती.


आता या वयातही नोकरी शोधणे काकांनी चालू केले परंतु त्यांना नोकरी मिळत नव्हती. तुम्ही दिवसभर घरीच असतात. तुमच्यासाठी मला तीन-चार वेळा चहा करावा लागतो, नाश्ता करावा लागतो, तुमचं जेवण करावं लागतं, तरी बाई या माणसाला माझी कवडीची किंमत नाही. इकडची काडी तिकडे करत नाही, नुसता बसून असतो, आळशी कुठला. काकूंची सारखी कुरकुर चालू होती. काकू म्हणत होत्या ते चुकीचं नसलं तरी काकांसमोर काही मार्गही नव्हता. काकांनी नाश्ता आणि चहा घेणे बंद केले, जेवणही कमी केले सर्व आवडी निवडी बाजूला ठेवल्या, तरीही काकूंची कुरकुर चालूच होती. 


शेवटी काकांनी भाटिया इंटरनॅशनल कंपनीत नोकरी लागली असे खोटेच सांगितले. आता मात्र ते दिवसभर घराबाहेर असायचे. एके दिवशी काका सिटी लायब्ररीत गेले. लायब्ररीत ३ कॉम्प्युटर पब्लिकच्या वापरासाठी ठेवले होते. कॅालेजमधील एका मुलीशी ओळख झाली, काकांनी तीचा प्रॅाजेक्ट रिपोर्ट टाईप करून दिला. तीने आग्रहाने काकांना त्याचा मोबदला दिला आणि तिच्या इतर मित्र-मैत्रिणींनाही काकांकडे पाठविले. काकांना थोडेफार पैसे मिळू लागले अर्थातच ते कंपनीतील पगाराच्या तुलनेत तुटपुंजे होते. 


पैसे वाचविण्यासाठी काका चालत जायचे नी यायचे. लायब्ररी जवळील मंदिरात असलेल्या अन्नछत्रात जे मिळेल ते खाऊन काका भूक भागवायचे. अपुऱ्या जेवणामुळे काकांची तब्येत ढासळली होती. गेले ४ दिवस मंदिर बंद असल्यामुळे काका ५ रूपयांच्या बिस्किट पुड्यावर भूक भागवत होते आणि त्यामुळेच त्यांचा चालताना तोल जात होता. काकूंनी चुकीचा अर्थ काढून काकांना व्यसन लागले असा सोयीस्कर गैरसमज करून घेतला.


काकांकडून हे ऐकताना नेहाच्या डोळ्यांत पाणी आले. काकांनी ठरलेले काम पूर्ण केले आणि सहा वाजता ते घरी जायला निघालेत. काका, मी तुम्हाला सोडते म्हणत नेहाने बळजबरीने काकांना रिक्षात बसवले. अय्या काका, हेच तुमचे घर का? मी काकूंना ओळखते, म्हणत नेहाही घरात शिरली. 


काका फ्रेश होण्यासाठी आत गेल्यानंतर नेहाने काकूंना सर्व काही सांगितल्याने काकूंचा काकांबद्दलचा गैरसमज दूर झाला. काका, आता तुम्हाला लायब्ररीत जाऊन मुलांचे प्रॅाजेक्ट रिपोर्ट टाईप करायची गरज नाही. तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन मला माझ्या कामात मदत करा. मी तुम्हाला चांगला पगार देईन. उद्यापासूनच तुम्ही येणे चालू करा, नेहाने सांगितले. आमच्या अॅाफिसमध्ये चहा, नाश्ता आणि जेवणही असते बरं का काकू, म्हणत नेहाने काकूंना लाजविले. परमेश्वरानेच तुला माझ्या मदतीसाठी पाठवले बेटा, असे म्हणत साश्रू नयनांनी काकांनी नेहाला हात जोडले.


थोड्या वेळाने काकू त्यांच्या भावाच्या घरी जाताना नेमकी पर्स बरोबर घ्यायला विसरल्या. पार्किंग मध्ये चालत असलेल्या त्यांच्या भावाला रिक्षाचे ७५ रुपये द्यायला त्यांनी सांगितले. माझ्याकडे अजिबात कॅश नाही असे म्हणत भावाने हात झटकले. तेवढ्यात त्याच सोसायटीत राहणाऱ्या राजच्या मित्राने रिक्षावाल्याला पैसे देऊन वर काकूंना १०० रुपये दिले, वहिनी तुम्हाला परत जायला लागतील म्हणत. 


भाऊजी निवृत्ती नंतर कसे चालले? काय करतात तुम्ही? काही नाही वहिनी मस्त खाणे, पिणे, मित्रांना भेटणे, मनसोक्त झोपणे अगदी आराम चालू आहे. सर्वच वेळ रिकामा असल्याने छंद जोपासतो, जे आयुष्यात करायचे राहून गेले ते करतो, फुल एनजॅाय करतो. ग्रॅच्युइटी, प्रॅाव्हिडंट फंडाची रक्कम फिक्स डिपॅाझिट मध्ये टाकली, त्याच्या व्याजावर छान जगतोय. भाऊजी अगदी फ्रेश दिसत होते.


निवृत्ती नंतरही नोकरीसाठी धडपड करणारा, बायकोला त्याच्या खाण्यापिण्याचा त्रास होऊ नये म्हणून दिवसभर घराबाहेर राहणारा, अन्नछत्रात मिळेल त्या अन्नावर भूक भागविणारा, बसचे भाडे वाचविण्यासाठी पायी जाणारा आपला नवरा चूकतोय की आपण? या विचाराने काकू शरमल्या.


राजला फोन करून त्यांनी विचारले, काय करतोस राज? ऊद्या पासून मला अॅफिसला जायचे ना, आत्ताच तयारी करून ठेवतो सकाळी धावपळ होऊ नये म्हणून. साठी पार केली तरीही राज तयार होता स्वतःला पुनश्च घाण्याच्या बैलासारखे जुंपून घ्यायला. राजची प्रकृती खालावली होती, शरीराने नव्हे पण मनाने तो फ्रेश होता. प्रतिकूल परिस्थितीतही रडत नव्हता तर लढत होता, स्वतःचे वय विसरून. किंचितही एनजॅाय न करताही आनंदी आणि फ्रेश असल्याचा आव आणून.


आपल्या भावाच्या चुकीमुळे आणि आपल्या अति खर्चिक पणामुळे राजवर पुनश्च नोकरी करण्याची वेळ आल्याचा काकूंना पश्चात्ताप झाला. आपण अनावश्यक खर्च थांबविला नाही तर राजला आयुष्यभर निवृत्त होताच येणार नाही याची त्यांना कल्पना आली. स्वतःत बदल करून राजला निवृत्ती नंतरचे उर्वरित आयुष्य त्याच्या आवडीप्रमाणे जगू देण्याचा निर्धार करूनच त्या घरी परतल्या. 


दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments