समाजभान
घरात नाही दाणा गोटा, डोरलं ठेवलं गहाण हो.
शेती मालास भाव मिळेना, देश आमुचा महान हो.
कास्तकार कष्ट उपसून, राहतो उपाशीपोटी.
जन सेवक लोकप्रतिनिधीची,उड्डाणे कोटीन कोटी.
कोणता धंदा, कसला व्यवसाय, कोणत असलं रानं हो...
शेती मालास भाव मिळेना देश आमुचा महान हो...||धृ||
उत्पन्नाचा स्त्रोत कोणता? रोज कले कलेने वाढतो.
पाच वर्षांत सांगता येईना, उत्पन्न एवढे काढतो.
कोणते बियाणे वापरतात हे, जे वाढते धाडधाड हो...
शेती मालास भाव मिळेना, देश आमुचा महान हो||१||
महागाईने बेजार जनता,बेरोजगारीने तरुणाई.
सुरुंग पेरते भ्रष्ट नीती, निमूटपणे पाहते लोकशाही.
सामान्यांना लुटणाऱ्याचे, कोण पुरविते लाड हो...
शेती मालास भाव मिळेना, देश आमुचा महान हो...||२||
सामाजिक प्रश्न सोडून,धर्मांधतेची कास धरती.
सरकारी बाबू हाताशी धरूनी,खऱ्याच ही खोटं करती.
गोर गरीब कष्टकऱ्यांची,इथे नसे कुणाला चाड हो...
शेती मालास भाव मिळेना, देश आमुचा महान हो...||३||
© कवी खंदारे सुर्यभान गुणाजी
नांदेड- 9673804554
Post a Comment
0 Comments