Type Here to Get Search Results !

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा "कालाय तस्मै नमः"



सदानंदांनी त्यांचा मुलगा राजच्या दरवाज्यावरची बेल वाजवली त्यावेळी रात्रीचे साडेनऊ वाजले होते. सदानंद आणि सावित्रीबाई सांगली जवळील एका छोट्याशा गावात राहत होते. सहा-सात तासांचा एस टी चा प्रवास करून पुण्याला आल्यामुळे ते दोघेही खूप थकले होते. 


कोण पाहिजे तुम्हाला? स्लीवलेस टी-शर्ट आणि शॅार्ट पॅन्ट घातलेल्या तरुणीने दरवाजा किंचितसा उघडून विचारले. सूनबाई, तू ओळखलं नाहीस का आम्हाला? मी आणि सूनबाई? अहो, अविवाहित आहे मी. 

कोण तुम्ही? कोणाकडे जायचं तुम्हाला? त्या तरुणीने त्रासलेल्या स्वरात विचारले.


माफ करा, हे बंडूचेच घर आहे ना? खात्री करून घेण्यासाठी सदानंदांनी विचारले. नाही, नाही येथे बंडू वगैरे कोणी राहत नाही असे म्हणताना त्या तरुणीने दरवाजा पूर्णपणे उघडला. ती सदानंद आणि सावित्रीबाईंची सून नव्हती. आम्हाला आमचा मुलगा बंडूकडे जायचंय, अंधारामुळे आम्ही घर चुकलो, क्षमा असावी असे म्हणत सदानंद आणि सावित्रीबाई जायला निघाले; तेवढ्यात मावशी, अगं हे माझे आजी-आजोबा आहेत असे म्हणत रीना आजोबांना बिलगली. 


रीनु बेटा कशी आहेस तू? तुझे बाबा कुठे आहेत? तुझी मम्मी कुठे आहे विचारत सदानंद आणि सावित्रीबाई घरात शिरलेत. माझे बाबा ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलेत आणि आई आईस्क्रीम आणायला गेली, येईलच आता.


तेवढ्यात नेहा म्हणजे रीनाची आई आली. काहीही न कळवता आणि असे अचानक तुम्ही आलात, सर्व ठीक तर आहे ना? नेहाने विचारले. ही माझी मावस बहीण, डॉक्टरेट करण्यासाठी पुण्याला आली आहे. नेहाने ओळख करून दिली.


तुमचं जेवण झालं असेलच ना? नसेल झालं तर मी करते तुमच्यासाठी स्वयंपाक, नेहा म्हणाली. घरात चिकन बिर्याणी आहे पण ती चालणार नाही ना तुम्हाला. आधी चहा करू का? की आईस्क्रीम घेता?


सूनबाई आम्हाला चहा नको, जेवण नको, अगदी आईस्क्रीम सुद्धा नको. पोट अगदी गच्च भरलंय आमचं, सदानंद म्हणालेत. तुम्ही तुमचं सामान या रूम मध्ये ठेवा आणि इथेच झोपा, नेहाने सांगितले. सदानंद आणि सावित्रीबाईंनी त्यांचे सामान नेहाने सांगितलेल्या रूममध्ये नेले. सावित्रीबाईंनी स्वतः खारीक खोबऱ्याच्या, साजूक तुपात बनवलेल्या लाडवांमधील एक लाडू रीनाला दिला. सुनबाई आणि मावशी तुम्ही पण लाडू घेतात का? सावित्रीबाईंनी प्रेमाने विचारले. 


नको नको, आम्ही गोड कमी खातो असे म्हणत नेहाने रीनाच्या हातातील लाडू ओढून घेतला. आई मला लाडू आवडतो, खाऊ देना मला म्हणणाऱ्या रीनावर नेहा ओरडली. रीना हे लाडू काळपट दिसतात. बहुतेक खूप पूर्वी केलेले असतील तू खाऊ नकोस, त्रास होईल तुला. मी उद्या तुला समोरच्या दुकानातून ताजे लाडू आणून देईन. मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने केले होते सावित्रीबाईंनी लाडू. मेथी आणि काळ्या मनुका घातल्यामुळे लाडू थोडेसे काळपट दिसत होते हे खरं पण ते शिळे नव्हते, त्यांनी लाडू कालच केले होते. 


लाडू खायला न मिळाल्यामुळे रीना हिरमुसलाी आणि नेहाच्या कडवट बोलण्यामुळे सावित्रीबाई दुखावल्या गेल्या. एकेक लाडू खाऊन नी पाणी पिऊन सदानंद आणि सावित्रीबाईंनी भूक भागवली नी स्वतःला निद्रेच्या स्वाधीन केले.


सकाळी सावित्रीबाईंनी चहा ठेवला. सूनबाई, मावशी पण चहा घेतील ना? त्यांनी विचारले. हो, पण आम्हा दोघींसाठी बिनसाखरेचा चहा करा. चहा करता करता सावित्रीबाईंनी पोहे देखील बनविले. पोहे खूप तिखट आणि तेलकट आहेत असे म्हणत नेहा आणि तिच्या बहिणीने पोहे खाल्ले नाहीत आणि रीनालाही खाऊ दिले नाहीत.


राज ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेला आहे, तो ४ दिवसांनी परत येईल, नेहाने सांगितले. सूनबाई, पांडुरंगावरची सिरीयल आहे, आम्हाला टीव्ही लावून दे ना, सावित्रीबाईंनी विनंती केली. टी व्ही खराब झाला आहे, मी मेकॅनिकला बोलावले आहे, नेहा म्हणाली. 


आजोबा मला ती परीची गोष्ट सांगा ना, रीनाने हट्ट धरला. सदानंद गोष्ट सांगू लागले. बाबा, ती इंग्रजी शाळेत शिकते, तीला मराठी गोष्ट सांगू नका. तीचे इंग्रजी बिघडेल ना. सदानंदांच्या उत्साहावर विरजण पडले, रीनाही हिरमुसली.


दुपारी दोघी बहिणी पार्लरला गेल्या. आजी मला सरबत करून दे ना, तू आणि आजोबा पण घ्या. सावित्रीबाईंनी सरबत बनविले. मला हा पिटुकला ग्लास दे, हे दोन मोठे ग्लास तुमच्यासाठी आहेत. आई म्हणाली, आजी-आजोबांना खोकला आहे, त्यांनी वापरलेले ग्लास आपण वापरायचे नाही. 


सकाळी टी व्ही मेकॅनिक आला होता. आईने त्याला ४-५ दिवसांनी यायला सांगितले आहे. पुढच्या आठवड्यात माझे दुसरे आजी-आजोबा येणार आहेत, रीना सांगत होती. रीना, ते तुला गोष्टी सांगतात का? तुझ्या बरोबर खेळतात का? अजिबात नाही, सारखे टी व्ही बघतात, फोनवर बोलतात आणि मला उगाचच रागावतात.


रात्री काही शर्ट्स नेहाने सदानंदांना दाखवलेत. शर्ट्स खूपच छान होते. बोलता बोलता नेहा म्हणाली, माझ्या बाबांनी थोडेच दिवस वापरलेले हे शर्ट्स अजूनही नव्या सारखेच आहेत. बाबा म्हणालेत तुमच्या वॉचमनला दे. इतके चांगले शर्ट्स का वॉचमनला द्यायचे? तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही घ्या. नको, नको, माझ्याकडे खूप कपडे आहेत असे म्हणताना सदानंदाचे डोळे पाणावलेत.


सावित्रीबाई आल्यापासून नेहाने घरातील सर्व जबाबदारी त्यांच्यावर टाकली. ती स्वतः मात्र तिच्या बहिणीशी गप्पागोष्टी करण्यात मग्न असायची. सदानंद आणि सावित्रीबाईंना हे खटकत होतं परंतु त्यांनी ठरविले की मुलाची येण्याची वाट पहायची कारण त्यांना त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे होते.


संध्याकाळी राजचा शाळेतील मित्र आला. काका, काकू, कसे आहात तुम्ही? किती दिवसांनी भेटता आहात? काकू, तुमच्या हातच्या खारीक खोबऱ्याच्या लाडवांची चव अजूनही आठवते मला. अगदी कमाल असायचे. निघताना सावित्रीबाईंनी दिलेली लाडवांची पिशवी त्याने आनंदाने घेतली. नेहा वहिनी, काका-काकूंना माझ्या घरी नक्की घेऊन या असे आग्रहाचे निमंत्रण त्याने दिले. 


रात्री नेहाने सदानंदांना एक मोबाईल दाखविला. हा मोबाईल माझ्या भावाने दुबईहून आणला आहे. या मोबाईलची किंमत भारतात २५०००/- रुपये आहे. माझा भाऊ हा मोबाईल १५०००/- रूपयांना विकतो परंतु तुम्हाला म्हणून १००००/- रुपयांत मिळेल. घ्यायचा का तुम्हाला? सूनबाई, मोबाईल खूप छान आहे परंतु माझ्याकडे एवढे पैसे नाहीत गं.


सदानंद आणि सावित्रीबाई रूममध्ये गेलेत नी मागोमाग रीनाही आली. आजोबा, तुम्हाला पैसे कमी पडत असतील तर माझ्या मनीबॅंकेतील पैसे घ्या. सदानंदांनी डोळ्यांतील पाणी लपवत रीनाला जवळ घेतले. 


दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राज आला. आपल्या मुलाला बंडू म्हणू नका हं, सूनबाईला आवडत नाही, सावित्रीबाईंनी सदानंदांना सूचना केली. सदानंद आणि सावित्रीबाईंची आदराने चौकशी करत राजने त्यांच्याशी छान गप्पा मारल्याने दोघांनाही आनंद झाला. पुण्याला आल्यानंतर त्यांना आज प्रथमच छान झोप लागली. 


बेटा, तुझ्या आईची ही औषधे १-२ दिवसात आण, सदानंदांनी मोठ्या अधिकाराने राजला सांगितले. आपल्या बिल्डिंग समोरच तर मेडिकल स्टोअर्स आहे. तुम्हीच आणा ना, राजच्या बोलण्यात उध्दटपणा होता. अरे, खरंच की, आणेन मी, दुखावलेला बाप म्हणाला. काल संध्याकाळी खूप प्रेमाने वागणारा राज एका रात्रीत बदलला होता.


दुसऱ्या दिवशी दुपारी मुलाशी काही तरी महत्वाचे बोलायचे म्हणून सदानंद हॅालमध्ये बसले होते. आज त्यांचा वाढदिवस होता, हे मुलाच्या नक्की लक्षात असेल, त्यांना खात्री होती. तुम्ही स्वतःहून सांगू नका असे सावित्रीबाईंनी त्यांना सकाळीच बजावले होते. 


रीना राजच्या फोनशी खेळत होती. आजोबा हा फोन तुमच्याकडे ठेवा, मी आलेच असे म्हणत ती बाल्कनीत गेली. तेवढ्यात राज बाहेर आला आणि त्याने सदानंदांकडून फोन घेतला. फोनवर दोन मिस कॉल होते, राजच्या बॅासचे. फोन का वाजला नाही? राजने नीट बघितले आणि त्याच्या लक्षात आले की फोन म्यूटवर होता. काय केले बाबा तुम्ही? माझी नोकरी घालवायची का तुम्हाला? अहो, तुमच्यामुळे माझे दोन महत्त्वाचे कॉल मिस झाले. आपण काय चूक केली ते सदानंदांना समजले नाही. 


जेवणानंतर गप्पा मारताना राज म्हणाला, चार दिवसांनी नेहाचे आई-वडील येणार आहेत आणि आम्ही सर्व महाबळेश्वरला जाणार आहोत, नेहाच्या बाबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. हे मी कोणालाही सांगितलेले नाही, मला नेहाच्या बाबांना सरप्राइज द्यायचे आहे. तुम्ही पण येणार का? सदानंद आणि सावित्रीबाईंनी महाबळेश्वर बद्दल खूप ऐकले होते, तेथे जाण्याची त्यांना तीव्र इच्छा होती परंतु राजने विचारलेल्या प्रश्नाला, नको बेटा, तुम्ही जाऊन या एवढेच सदानंद म्हणालेत. 


रात्रभर सदानंद आणि सावित्रीबाईंना झोप लागली नाही. आपण सकाळीच निघून जायचे असे दोघांनी ठरविले. दोघेही सकाळी रूममधून बाहेर आले ते निघण्याची पूर्ण तयारी करूनच. तुम्ही जाण्याची इतकी घाई का करता आहात? राज आणि नेहाने विचारले. इकडे आमचे मन लागत नाही गावाकडची आठवण येते. चला निघतो आम्ही, तुम्ही सुखी रहा. आजी-आजोबा, तुम्ही जाऊ नका ना, रीना म्हणत होती. 


नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गाडी घेऊन जाणार आहे नाहीतर मीच तुम्हाला बस स्टँडवर सोडले असते, राज म्हणाला. बाबा, मला नमस्कार तर करू द्या, राज म्हणाला. बेटा, एक काळ असा होता जेव्हा तू लहान होतास आणि आम्ही आशीर्वाद देण्याइतके मोठे होतो परंतु काळानुरूप तू खूप मोठा झालास आणि आम्ही होतो त्याच ठिकाणी राहिलो. आमची लायकी नाही रे तुला आशीर्वाद द्यायची. चल सावित्री, आपल्याला निघाले पाहिजे, उशीर होतोय म्हणत दोघेही सामान घेऊन चालू लागले. 


साधारणतः पंधरा मिनिटांनी नेहा तिच्या बहिणीला एअरपोर्टला सोडण्यासाठी गेली. रीना तुही ये ना मला सोडायला, मावशी आग्रह करत होती. नको, मला माझ्या बाबांशी खूप बोलायचे आहे रीना म्हणाली. 


राजच्या मित्राचा फोन आला, राज आज संध्याकाळी काका-काकूंना माझ्या घरी घेऊन ये ना. काकूंनी केलेले लाडू माझ्या बायकोला आणि मुलीला खूप आवडले. ते कसे करायचे ते माझ्या बायकोला काकूंकडून समजून घ्यायचे आहे, राजचा मित्र सांगत होता. मित्रा, महत्त्वाचे काम निघाल्यामुळे ते दोघेही आत्ताच गावाकडे गेलेत, राजने सांगितले.


रीना बेटी आजी-आजोबांनी लाडू आणले होते? 

राजने विचारले. हो बाबा आणि आजीने मला पण लाडू दिला होता परंतु आईने मला खाऊ दिला नाही. आई म्हणाली हे लाडू काळे आहेत म्हणजे कधीचे केलेले असणार, खाऊ नकोस तुला त्रास होईल. बोलता बोलता रीनाने मोबाईल घेण्यासाठी आजोबांकडे पुरेसे पैसे नव्हते, मी माझ्या मनी बँकेतील पैसे आजोबांना दिले परंतु त्यांनी ते घेतले नाही असेही राजला सांगितले. बाबा, हे बटन दाबल्याने काय होते? काल मी ते गंमत म्हणून दाबले होते. बेटा, याने फोन म्यूटवर जातो. काल कॅाल्स मिस झाले ते बाबांमुळे नाही तर रीनामुळे झाले होते. नेहाने आणि त्याने आई-बाबांना अपमानित केले होते. 


बाबा, आजोबा त्यांचे पैशांचे पाकीट घराीच विसरले म्हणत रीनाने कॅाटवर पडलेले आजोबांचे पाकीट राजला दिले. राजने पाकीट उघडून बघितले. त्यात

फक्त परतीच्या तिकिटांचे पैसे होते. म्हणजे पैसे नव्हते म्हणून आईची औषधे आणायला बाबांनी मला सांगितले असेल का? या विचाराने राज व्यथित झाला. पाकीटात एक फोटो होता, राज इंजिनिअरिंगची फायनल परीक्षा पास झाला त्यावेळी आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवतानाचा. 

त्याला आई-बाबांनी काढलेल्या हलाखीच्या दिवसांची आठवण झाली आणि पश्चाताप झाला आईवडिलांशी इतके निष्ठुर वागल्याचा. 


पैशांचे पाकीट घरी राहिले मग आई बाबा बस स्टँडवर कसे गेले असतील? रिक्षाचे पैसे त्यांनी कसे दिले असतील? रीना बेटा, चल आपण बस स्टँडवर जाऊया. राज आणि रीना बिल्डींगच्या गेटपाशी आलेत त्यावेळी बिल्डिंगमध्येच राहणाऱ्या त्याच्या मित्राची गाडी आत शिरली आणि त्याने सांगितले, राज मी माझ्या आई-बाबांना सोडायला बस स्टँडवर गेलो होतो त्यावेळी मी तुझ्या आई-बाबांनाही बस स्टॅंडवर सोडले. थॅंक्स मित्रा, राज म्हणाला.


म्हणजे बाबांना पाकीट घरी राहिल्याचे तेव्हाच समजेल जेव्हा ते कंडक्टरकडे बसचे तिकीट मागतील. आता काय करायचे? राजला कोणताही मार्ग समोर दिसत नव्हता. एक दीड तास झाला तरीही आई-बाबा घरी परत आले नव्हते म्हणजे कदाचित आईकडे पैसे असतील आणि त्यातून त्यांनी बसचे तिकीट काढले असेल असा विचार करत राज निश्चिंत झाला.


संध्याकाळी राजला एका अनोळखी नंबर वरून फोन आला. राज मित्रा, मी एस टी त कंडक्टर आहे. तुझे आई-बाबा माझ्याच बसमध्ये होते. त्यांच्याकडून मी तुझा नंबर घेतला. पाकीट घरी राहिल्यामुळे त्यांच्याकडे तिकिटाचे पैसे नव्हते परंतु मी त्यांना तिकिट दिले आणि सांगलीला पोहोचल्यावर त्यांना घरापर्यंत पोहोचविले, तू अजिबात काळजी करू नकोस. राजसाठी हा सुखद धक्का होता. मित्रा, मी किती पैसे पाठवू? राजने विचारले. छे छे, पैसे नको पाठवूस. राज, अरे काका-काकूंनी किती प्रेम दिले आहे मला, थोडंसं त्यांच्यासाठी करायला मिळाले हे माझे केवढे मोठे भाग्य. माझ्या आई-बाबांशी केवढ्या आपुलकीने वागले माझे मित्र आणि मी किती चुकीचा वागलो, राजला स्वतःचीच लाज वाटली.


ठरल्याप्रमाणे नेहाचे आई-वडील आलेत. राज त्यांच्या बरोबर महाबळेश्वरला गेला परंतु त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. महाबळेश्वरहून परत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज त्याच्या गावाकडे आला. घरी पोहोचल्यावर अनेकदा बेल वाजूनही दार उघडले नाही तेव्हा त्याच्या लक्षात आले की घराला बाहेरून कुलूप लावले आहे. आई बाबा कुठेतरी बाहेर गेले असतील, आपण इथेच थांबावे असा राजने विचार केला आणि तेवढ्यात त्याचे लक्ष दरवाजावर लावलेल्या एका कागदावर गेले. त्या कागदावर लिहिले होते, हे घर बॅंकेने जप्त केले आहे, बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे. 


गेल्या ३ महीन्यात दोनदा बॅंकेची नोटीस आली होती सदानंदांना, परंतु ते पैसे उभे करू शकले नाहीत. अंतिम नोटीस आली, पैसे भरले नाही तर जप्ती येईल

असे स्पष्ट शब्दांत सांगणारी. म्हणूनच सदानंद आणि सावित्रीबाई राजकडे पैसे मागायला म्हणून आले होते. सुनेनेच नाही पण मुलाने देखील अपमान केला म्हणून त्यांनी जप्ती टाळण्यासाठी लागणाऱ्या पैशाचा विषयच काढला नाही आणि रिकाम्या हाताने ते घरी परतले. आलीया भोगासी असावे सादर हे मनोमनी ठरवून.


खरंतर राज हा त्यांचा एकुलता एक मुलगा, अतिशय हुशार. शिक्षण होताच चांगली नोकरी मिळाली आणि साहेबांच्या मुलीच्या प्रेमात पडला. साहेब खूप श्रीमंत, गाड्या नी बंगलेवाले पण पारसी. राजचे आई-बाबा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. मुलाने पारसी मुलीशी लग्न करायचे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी कडाडून विरोध केला पण राज मागे हटला नाही. सदानंद आणि सावित्रीबाई दुखावले गेलेत, त्यांनी मुलाशी संबंध तोडले. नातीच्या जन्माने पुनर्मिलन झाले, त्यांचे राजकडे येणे-जाणे सुरू झाले परंतु राज आणि नेहाच्या मनात अजूनही त्यांच्या बद्दल राग होता. 


राज त्वरित बँकेत गेला. त्याने विचारणा केली, किती कर्ज बाकी आहे? हे कर्ज कधी घेतले होते? सदानंदांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते आणि त्यातील ७५,०००/- रुपये अजून बाकी होते. पंधरा वर्षांपूर्वी, म्हणजे राजने पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजला अॅडमिशन घेतली त्यावेळी त्याच्या बाबांनी ते कर्ज काढले असावे. बाबा कधी बोललेही नव्हते याबद्दल. राजने त्वरित ७५,०००/- रुपये बँकेला ट्रान्सफर केले आणि म्हणाला मला आमच्या घराची किल्ली द्या. 


मी तुम्हाला किल्ली देऊ शकत नाही. साहेब मी पैसे ट्रान्सफर केलेत ना, बघा, चेक करा, तुम्हाला ते मिळालेत ना? पैसे मिळालेत. तुमच्या वडिलांवर आता कर्ज बाकी नाही असे लेटर मी तुम्हाला देतो. तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन या, मी त्यांना घराची किल्ली देईन.


साहेब, पण ते कोठे आहेत हे मला माहित नाही. तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या वडीलांना आणा नाहीतर त्यांचे डेथ सर्टिफिकेट आणा. साहेब, काय बोलतात? अहो ते जिवंत आहेत फक्त ते कुठे आहेत ते माहीत नाही. 

मग शोधा त्यांना, म्हणत मॅनेजर साहेब दुसऱ्या कामात गर्क झालेत.


राजला विश्वास आहे आई-बाबा मिळतील, त्याच्या चूका विसरून ते त्याला मोठ्या मनाने माफ करतील. तो आई-बाबांचा शोध घेतो आहे परंतु अजूनही त्यांचा पत्ता त्याला लागला नाही आणि यापुढेही पत्ता लागेल, याची खात्री नाही. 


काय आश्चर्य आहे ना! ते समोर होते तेव्हा नकोसे वाटत होते आणि आता नजरेसमोरून गेलेत तर हवेसे वाटतात.

कालाय तस्मै नमः।


-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments