Type Here to Get Search Results !

कुमशेत शाळेत कृषी दिन उत्साहात साजरा



कुमशेत : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथे आज कृषी दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. इ १ ली ते ४थीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये शेतीप्रती आदर आणि कृतज्ञतेची भावना जागृत व्हावी, यासाठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीने झाली. विद्यार्थ्यांनी शेतीच्या महत्त्वपूर्ण पिकांची नावे सांगून त्यांच्या उपयुक्ततेचे महत्त्व विशद केले. यामध्ये तांदूळ, नागली, मका, हरभरा, सोयाबीन, कांदा आदी पिकांवर माहिती दिली. रासायनिक शेती व सेंद्रिय शेती यावरील साधक-बाधक मुद्देही विद्यार्थ्यांनी मांडले.



दिवसभर चाललेल्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी शेतीशी संबंधित चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन, अनुभव कथन, आणि शेतीविषयक नाटुकली सादर केली. चौथी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि संचालन केले, यामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली.


श्याम लोलापोड सरांनी शेतकऱ्यांचे समाजातील योगदान, शेतीची आव्हाने आणि शाश्वत शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना साध्या भाषेत समजावले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरेही घेतली, ज्यामुळे चर्चा अधिक रंगली.


यश घोडे सरांनी आपल्या सर्जनशील कवितेतून बळीराजाची वेदना, निसर्गाशी चाललेली त्याची झुंज आणि समाजाची भूमिका हृदयस्पर्शी शब्दांत मांडली. त्यांच्या कवितेला विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.


कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यात प्रसाद डोके यांनी उपस्थित मान्यवरांचे, शिक्षकवृंदाचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले. 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शेतकरी, शेती आणि निसर्ग यांच्याविषयी कृतज्ञता, सन्मान आणि संवेदनशीलता जागी झाली. शाळेतील कृषी दिनाचे आयोजन सर्वत्र कौतुकास्पद ठरले.

Post a Comment

0 Comments