Type Here to Get Search Results !

लेखक दिलीप कजगांवकर लिखित कथा "साधेपणा"



रविवारचा दिवस. सकाळी अकराचा सुमार. पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसर.


तू अजय का? फर्ग्युसन महाविद्यालय, १९९४ ची बॅच? आणि तू विजय? विजय पगारे? चक्क ३० वर्षांनंतर दोघे एकमेकांना भेटले.


कडक इस्त्रीचे कपडे, हातात महागडे घड्याळ, डोळ्यांवर भारी गॉगल, अजयची अगदी रुबाबदार पर्सनॅलिटी. श्रीमंती मनसोक्त डोकावत होती.


विजयचे कपडे आणि राहणीमान अगदी साधे. 


विजय, चल आपण इथे चहा घेऊ, एका भव्य बिल्डिंगमधील आलिशान हॉटेलकडे बोट दाखवत अजय म्हणाला. 


इथे? विजयची प्रश्नार्थक नजर. 


अरे मित्रा, डोन्ट वरी, हॉटेल महाग असेल पण मी देईन पैसे. तू काळजी करू नकोस. मी नेहेमीच अशा महागड्या हॅाटेलात जातो. आज घे अनुभव तू ही.


दोधांनी चहा घेतला. छान गप्पा झाल्या, बराच वेळ अजयच बोलत होता, विजय शांतपणे ऐकत होता. कोथरूडला दोन बेडरूमचा फ्लॅट, मारुती स्विफ्ट. अजय वेल सेटल्ड होता. 


नमस्कार सर, अगदी आदबीने हॉटेलचा मॅनेजर म्हणाला. माझ्या पर्सनॅलिटीचा परिणाम, मनातल्या मनात अजय सुखावला. 


सर तुमच्याकडून पैसे नकोत, हॉटेलचा मॅनेजर म्हणाला. 


तुम्ही मला कसे ओळखतात? मनातल्या मनात खुश होत अजयने विचारले. 


सर, मी तुम्हाला नाही पण विजय सरांना ओळखतो. 


ते कसे? मोठ्या कुतुहलाने अजयने विचारले.


या हॉटेलचे आणि संपूर्ण बिल्डिंगचे मालक आहेत विजय सर!


ना वागण्यात, ना बोलण्यात, ना राहणीमानात, श्रीमंतीचा दिखावा कोठेही नव्हता. होता तो फक्त आणि फक्त साधेपणा.


-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment

0 Comments