Type Here to Get Search Results !

फोफसंडीमध्ये निसर्गसंगीताच्या साक्षीने 'नक्षत्र पाऊस काव्य सहल' संपन्न

 


महाराष्ट्राचे मॉरिशस म्हणवल्या जाणाऱ्या फोफसंडीच्या कुशीत निसर्ग व कवितेचा अभूतपूर्व संगम

पुण्याच्या भोसरी येथील नक्षत्राचं देणं काव्यमंच यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणारी पावसाळी काव्यसहल यंदा अतिदुर्गम पण निसर्गरम्य फोफसंडी (ता. आंबेगाव) येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या भागाला ‘महाराष्ट्राचे मॉरिशस’ म्हणून ओळखले जाते, आणि यंदा या परिसरात शब्द, सरी आणि संगीत यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.

सहल शिवजन्मभूमी जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादनाने सुरू झाली. नंतर पावसाच्या गार सरिंत चिंब होत, धुक्याच्या दुलईत लपेटलेल्या सह्याद्रीच्या कुशीतून निघालेली ही साहित्यिक मंडळी फोफसंडीच्या दिशेने वळली. वाटेत दिसणारे शेकडो धबधबे, झुळझुळ वाहणाऱ्या नद्या, रिमझिम सरी आणि वाऱ्याचा कुशीत शिरणारा थरार – या सर्व निसर्गसंपदेनं सहभागी सदस्यांना मंत्रमुग्ध केलं.



फोफसंडी गावी सुरेश घोडे यांच्या हाँटेलमध्ये शेंगोळी, बाजरीची भाकरी, ठेचा, भात, लोणचं आणि पापडासह स्वादिष्ट जेवण याचा आस्वाद घेतला गेला.

कवी वादळकार, सुरेंद्र विसपुते, आणि यशवंत घोडे फोफसंडीकर यांच्या प्रेम, पाऊस, निसर्ग व जीवनावर आधारित कवितांनी आसमंत भारून टाकला. प्रत्येक ओळ पावसाच्या थेंबासारखी श्रोत्यांच्या मनात झिरपत गेली.

स्थानिक गाईडनी फोफ हाऊस, कोळंब किल्ला, मांडवी ऋषींची गुहा, मांडवी नदीचा उगम, रांजणखळगे, शेकडो नैसर्गिक गुहा व ढोली अशा परिसरातील ऐतिहासिक व नैसर्गिक स्थानांची ओळख करून दिली. उपस्थितांनी या अनोख्या ठिकाणांचा फोटोंसह मनमुराद आनंद घेतला.



या सहलीत सौ. अलका खोसे, सुनील थोरात, ऋचा भोसले, सौ. दिव्या भोसले, सौ. प्रीती सोनवणे, चि. साईराजे सोनवणे, सौ. संगीता सोनवणे, राजेंद्र सोनवणे, प्रताप जगताप, संपत नायकोडी, सचिन फुलपगार, ज्ञानेश्वर काजळे, किसन शिंगोटे, सौ. संगीता शिंगोटे, विजया सोनटक्के, प्रशांत सोनटक्के, प्रतीक्षा विसपुते, सुरेंद्र विसपुते, विजया माळवदकर, अशोक कुलकर्णी, बबन चव्हाण, बाळू गावडे, सौ. सविता गावडे, श्वेता साठे, रोहन साठे, तेजल देडगांवकर, सुनिता पांढरकर, अशोक पांढरकर, सुमन शिंगेवार, अनुराग मिश्रा इत्यादींनी सहभाग घेतला.

प्रा. राजेंद्र सोनवणे, यशवंत घोडे, भरत वाजे, साळू घोडे, सुरेश घोडे, प्रविण घोडे, अभिषेक घोडे, रोशन तुपे यांनी अत्यंत उत्कटतेने सहलीचे यशस्वी आयोजन केले.

ही सहल ही केवळ पावसात भिजण्याची नव्हती, तर भावनांत भिजण्याची होती – निसर्गाशी पुन्हा नातं जोडण्याची होती. फोफसंडीच्या कुशीत ही नक्षत्र पाऊस काव्य सहल एक संस्मरणीय अनुभव देऊन गेली, जो सहभागी प्रत्येकाच्या आठवणींच्या कोपऱ्यात सदैव झरझरत राहील.

Post a Comment

0 Comments