कुमशेत जुन्नर | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथे गुरुपौर्णिमा हा दिवस उत्साहात, संस्कारमय व भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय परंपरेत गुरू हे केवळ शिक्षकच नसून जीवनदृष्टी देणारे मार्गदर्शक मानले जातात. ही शिकवण विद्यार्थ्यांच्या मनामनात रूजवण्यासाठी या दिवशी विविध उपक्रम राबवले गेले.
कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या बालसभेने झाली. या सभेचे नियोजन, सूत्रसंचालन आणि सहभाग सर्वस्वी विद्यार्थ्यांनीच पार पाडला, हे विशेष!
विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता, भाषणे आणि गुरूंवरील अनुभवकथनातून गुरूंच्या ऋणानुबंधाची जाणीव व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी प्रेमाने तयार केलेली हस्तनिर्मित ग्रीटिंग कार्ड्स गुरूंना भेट दिली. ही कृती त्यांच्या मनातील गुरुप्रेम आणि कृतज्ञतेचे सजीव प्रतिबिंब ठरली.
श्याम सरांनी मार्गदर्शन करताना गुरू-शिष्य परंपरेचे ऐतिहासिक आणि मूल्याधारित महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना गुरूंच्या शिस्त, श्रद्धा व आचरण या गोष्टींचं महत्त्व पटवून दिलं.
यानंतर कवी यशवंत घोडे सरांनी प्राचीन गुरुकुल शिक्षणपद्धतीचे दर्शन घडवत, विद्यार्थ्यांना चारित्र्य, सेवाभाव, आणि निस्वार्थ ज्ञानदान यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सादर केलेली स्वरचित कविता विद्यार्थ्यांच्या मनाला भिडली आणि वातावरण अधिकच प्रेरणादायी झाले.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी परिसरातून पानाफुलांचे गुच्छ स्वतः तयार करून शाळेतील शिक्षक व उपस्थित पाहुण्यांना यशवंत घोडे सर, श्याम सर, सुलोचना डोके मॅडम, अमृता डोके मॅडम व हर्षदा डोके मॅडम यांना भेट दिले. ही त्यांची आपुलकीची व कृतज्ञतेची सुंदर अभिव्यक्ती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
याप्रसंगी नवनियुक्त अंगणवाडी सेविका सौ. अमृता अक्षय डोके, मदतनीस सौ. हर्षदा डोके, तसेच माजी सेविका सौ. सुलोचना डोके, व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच गौरव प्राप्त झालं
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक, आई-वडील आणि गुरू या जीवनातील तीन महत्त्वाच्या आधारस्तंभांबद्दल आदर, कृतज्ञता आणि संस्कारांची बीजे रोवली गेली. विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांची उपस्थिती यामुळे हा उपक्रम एक संस्कारात्मक पर्वणी ठरला.
Post a Comment
0 Comments