Type Here to Get Search Results !

शिवनेरी स्कूलमध्ये 'स्टडी मॅरेथॉन 'चे यशस्वी आयोजन


प्रतिनिधी जुन्नर : प्रा. प्रविण ताजणे सर

जुन्नर, १० जुलै २०२५ – गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने शिवनेरी स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासातील एकाग्रता, सातत्य आणि स्पर्धात्मकता वाढविण्याच्या उद्देशाने ‘स्टडी मॅरेथॉन ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या १२ तासांच्या सलग अभ्यास सत्रात इयत्ता ५वी ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


या उपक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सीए अमीर तांबोळी यांच्या हस्ते संपन्न झाले. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी गुरूंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रयत्नांची दिशा दिली.


या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांची कोणताही व्यत्यय न येऊ देता, सातत्याने अभ्यास करण्याची क्षमता तपासणे. सकाळपासून सायंकाळपर्यंत विविध अभ्यास सत्रांत सहभागी होत विद्यार्थ्यांनी आपले आत्मनियंत्रण, वेळेचे व्यवस्थापन आणि एकाग्रता यांचे उत्तम दर्शन घडविले.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शिवनेरी फाउंडेशनचे सचिव श्री. शुभंकर कणसे, सीईओ सौ. श्रद्धा कणसे, कॅम्पस इन चार्ज श्री.राजेंद्र मुरादे, प्रशासकिय अधिकारी श्री. ज्ञानेश्वर पटाडे , मुख्याध्यापक संजय मिश्रा, उपमुख्याध्यापक श्री. अमोल थोरात आणि शिक्षकवृंद यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या अभ्यासातील चिकाटीचे कौतुक केले.


कार्यक्रमानंतर अभ्यासातील उत्कृष्ट सहभागासाठी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. आयोजकांनी सांगितले की, “स्टडी मॅरेथॉनसारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक दृष्टिकोन अधिक सकारात्मक आणि शिस्तबद्ध बनवण्यास मोलाची मदत करतात.”


शिवनेरी स्कूलने ‘गुरुपौर्णिमा’ या पारंपरिक सणाला आधुनिक शैक्षणिक अंगाने साजरे करून एक प्रेरणादायी पायंडा पाडला आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती शफाक खान व आभार प्रदर्शन सौ. धनवंती ढोले यांनी केले.

Post a Comment

0 Comments