दुर्लक्षित अर्थतज्ञ बाबासाहेब
नैतिक जबाबदाऱ्या वाऱ्यावर सोडून
चळवळीची धुरा हाती घेतलेल्या
माझ्या अगणित सूर्यांनो...
तुमच्या लेखणीच्या ज्वाळाने उजाळून निघेल काही काळ मंचकावरचा अंधःकार...
मिळतील टाळ्या बेशुमार...
होतील सत्कार, मिळतील पुरस्कार...
पण...
त्याचे पडसाद आपल्या परिस्थितीवर उमटतील
आणि तुमच्या चुली भराभरा पेट घेतील
याची खात्री मात्र बाळगू नका...
कारण...
खिशातला गांधी कायम उपोषणाला बसलेला असताना
तुमचा बाबासाहेब ऐकण्यात कोणाला फारसा रस नसतो...
त्यांना तुमच्यात दिसतो फक्त नी फक्त एक मागासवर्गीय...
भविष्य नसलेला...
पसाभर पुडके कमावणाऱ्यांच्या तुलनेत
चांगल्या गुणांनी आवळलेल्या मुठी गळून पडतात काहीच क्षणात...
सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या कालचक्रात तारुण्याचा मोहोर भरडला जातो...
आणि चळवळीत पांढरा झालेला बाप लेकीसाठी सोयीची सोयरीक पाहतो...
तू वाचला असशील पूर्ण बाबासाहेब...
आभाळा सारखा व्यापक
समुद्रा इतका विशाल
पर्वता एवढा उंच
सामाजिक ते राजकीय...
राज्यशास्त्रज्ञ ते कायदेतज्ञ...
पण अर्थतज्ञ बाबासाहेब तू कायम दुर्लक्षित केलास...
आणि इथेच गणित चुकलं!
काहींना गांधी प्रिय आहे, पण फक्त नोटांवरील!
तुही त्या गांधींना आपलसं करून घे...
बाबासाहेबांचा 'द प्रॉब्लेम ऑफ द रुपी' डोळ्यांत भरून घे...
मग बघ...
कोणीही तुझ्या आर्थिक परिस्थितीवर
हसणार नाही...
आणि नोटांवरील गांधी पुन्हा कधीच
उपोषणाला बसणार नाही...
सुमेध वंदना मधुकर सोनावणे
9967162063

Post a Comment
0 Comments