नुकतेच बांधकाम झालेले सदानंदांचे घर तसे शहराबाहेरच होते. वळणावळणाचा नी थोड्या चढावाचा रस्ता संपल्यावर, मुख्य रस्त्यावर साधारणतः दोन किलोमीटर पुढे गेल्यावर, मुख्य रस्त्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर आंत.
एके दिवशी संध्याकाळी सदानंद स्कूटीवरून घराबाहेर पडलेत. मुख्य रस्त्यावर आल्यावर त्यांना एक टेम्पो बंद पडलेला दिसला. टेम्पोच्या जवळपास कोणीही नव्हते. नीट बघितले असता त्यांना टेम्पोतील साखरेच्या गोण्या दिसल्या. प्रयत्न करत टेम्पोतील एक गोणी काढण्यात ते यशस्वी झाले आणि बेमालूमपणे ती गोणी घेऊन ते घरी परतले.
काय आहे यांत? सावित्रीबाईंनी विचारले.
सावित्री, अगं दिवाळी जवळ आली ना, म्हणून साखरेची गोणीच घेऊन आलो.
पुढच्या दिवशी जवळपास त्याच जागेवर बंद पडलेल्या ट्रॅक्टर मधून त्यांना शेंगदाण्यांचे पोते मिळाले. नंतरच्या आठवड्यात तेलाचा डबा मिळाला.
महीन्यात २-३ वस्तू फुकटात मिळू लागल्या. नवीन घर चांगलेच लाभले होते त्यांना. नवीन जागेत सदानंदांची कमाई वाढली आणि म्हणूनच ते सढळ हाताने खर्च करतात असा सावित्रीबाईंचा समज झाला. एकंदर मस्त चालले होते.
आज सकाळी सदानंद घरातून बाहेर पडले ते थोडे चिंतेतच, कारण काल स्कूटीत पेट्रोल भरायला ते विसरले होते. निदान दोन-तीन किलोमीटर स्कूटी ढकलावी लागणार याची चिंता त्यांना सतावत होती. वा, वा, ना, काय ते भाग्य! आज तर पेट्रोलचा टॅंकरच बंद पडला होता. नेहेमी जेमतेम १०० रूपयांचे पेट्रोल भरणाऱ्या सदानंदांनी टाकी फुल भरली, फुकटच्या पेट्रोलने. मोठ्या आनंदात पुढे निघालेले सदानंद त्वरित माघारी फिरले. घराच्या पडवीतील पाण्याने काठोकाठ भरलेला पिंप त्यांनी रिकामा केला आणि थोड्याच वेळात त्यात पेट्रोल घेऊन ते मोठ्या खुषीत परतले.
अहो, मी चुलीवर पाणी तापवते तुमच्या स्नानासाठी, सावित्रीबाईं म्हणाल्या. तेवढ्यात सदानंदांची नजर २ लिटरच्या पाण्याच्या बाटलीकडे गेली. बाटलीतील पाणी झाडाला टाकून सदानंद त्वरेने निघालेत फुकटात मिळणारे पेट्रोल आणायला. तू पाणी तापव, मी आलोच पाच मिनिटांत, असे सावित्रीबाईंना सांगत.
एव्हाना पेट्रोल घ्यायला ५-६ माणसं गोळा झाली होती. आपला नंबर येण्याची वाट पाहत थांबलेल्या सदानंदांची नजर टॅंकरवरील "सावधान, अत्यंत ज्वालाग्रही" या सूचनेवर गेली. त्याचवेळी एक आजोबा ओरडून सांगत होते, पेट्रोलचा वास येतोय, दूर पळा, कधीही आग लागू शकते. मोह नी हव्यास टाळा आणि त्वरित पळा.
सर्व जण पळालेत, बाटली फेकून सदानंदही घराकडे निघालेत. पडवीतील पाण्याच्या पिंपात पाणी नव्हे तर पेट्रोल होते. सावित्रीबाईंनी चूल पेटवली तर? चूलीवरील भांड्यात त्यांनी पाणी समजून पिंपातील पेट्रोल टाकले तर? सावित्री ठीक तर असेल ना?असंख्य विचारांच्या दडपणाखाली ते स्कूटी चालवत होते, रस्ता संपता संपत नव्हता.
सदानंद घरी पोहोचले. चूल पेटलेली नव्हती पण सावित्रीबाई मात्र कुठेही दिसत नव्हत्या. सदानंद हॅालमध्ये गेलेत, किचनमध्ये गेलेत, अगदी बेडरूममध्येही गेलेत. सावित्रीबाईं कुठेही दिसल्या नाहीत. सदानंदांना गरगरू लागले, तशातही ते सावित्रीबाईंना हाका मारत होते.
केव्हा आलात तुम्ही? माफ करा मला, चूल पेटवायला उशीर झाला. तुम्ही जरा आराम करा, मी चूल पेटवून तुम्हाला गरम पाणी करून देते. आलेच मी.
थांब सावित्री, सदानंद आोरडून म्हणालेत. कुठे होतीस? काय करत होतीस? मी सगळीकडे शोधलं तूला? तू ठीक तर आहेस ना?
अहो, मी चूल पेटवायला गेले पण तिथली आगपेटी संपली होती. मी देवघरात गेले आगपेटी आणायला तेव्हा माझ्या लक्षात आले की आज चतुर्थी आहे. मग मी प्रथम पूजा केली. देवघरातली आगपेटी घेतलीय मी बरोबर. चला मी प्रथम चूल पेटवते नी नंतर देवाला आरती करते. दहा मिनिटांत पाणी तापेल.
सावित्री, थोडं थांब. तू चूल पेटवू नकोस आणि आरतीही करू नकोस. प्रथम मी पिंप दूर नेऊन खाली करतो, पिंप स्वच्छ धुवून त्यात पाणी भरतो. अहो, पिंप तर भरलेला आहे ना. हो पण पाण्याने नाही तर पेट्रोलने.
तू पूजा करण्याआधी चूल पेटवली असतीस तर? भांड्यात पाणी समजून पेट्रोल टाकले असते तर?
नको, नको, विचारही केला जात नाही. गणपती बाप्पानेच वाचवलं आपल्याला.
चल, आपण मनोभावे देवाला नमस्कार करून म्हणू या -
ओम गं गणपतये नमो नमः।
श्री सिद्धिविनायक नमो नमः।
श्री अष्टविनायक नमो नमः।
गणपती बाप्पा मोरया।
सावित्री, मी शपथ घेतो की आता यापुढे, फुकटात नी चूकीच्या मार्गाने वस्तू मिळविण्याचा माझा हव्यास मी कायमचा बंद करतोय.
-दिलीप कजगांवकर, पुणे
Post a Comment
0 Comments