प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
जुन्नर, प्रतिनिधी : संतश्रेष्ठ माउली श्रीज्ञानेश्वर महाराजांनी प्रारंभ केलेल्या भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी शिवनेरीवरुन गेलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांचे स्वस्थानी शिवनेरीवर आगमन झाले. श्रीशिवजन्मभूमी स्थानी पादुकांच्या साक्षीने शिववंदना अभिवादन झाल्यानंतर, मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी श्री शिवाई देवीच्या चरणांशी श्रींच्या पादुकांना स्थापित केले. याप्रसंगी उपस्थित बालगोपालांच्या हस्ते शिवाई देवी व शिवाजी महाराजांच्या आरतीने या वर्षीच्या सोहळ्याची सांगता झाली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या ३५१ व्या वर्धापन वर्षात, ज्येष्ठ शुद्ध एकादशीस शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका राजाभिषेक उत्सवासाठी राजधानी रायगडास गेल्या होत्या. तेथून आपल्या निर्धारित मार्गाने पायीच प्रवास करत आषाढी एकादशीस शिवबा-विठोबा भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत हौतात्म्य पावलेल्या आपल्या सहकाऱ्यांना दर्शन भेट द्यायला गेल्या होत्या. पावनखिंड, विशाळगड, नेसरी, कापशी, कुरुंदवाड, वडगाव, तळबीड, उमरठ मध्ये आपल्या पराक्रमी सहकारी मावळ्यांशी हितगुज केल्यानंतर जुन्नरखालील बारा मावळांचा प्रवास करुन भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेवून शिवजन्मभूमीत परतल्या. श्रीशिवछत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉ. संदीपराज महिंद गुरुजी याप्रसंगी बोलताना म्हणाले, कोरोनाचे बिकट संकट असतानाही आपल्या नियमित प्रथा-परंपरा जपताना २०२० व २०२१ लाही शिवरायांचा पालखी सोहळा रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता. आषाढी वारीत आपली पायी चालण्याची परंपरा प्रतिकूलतेतही अखंडितपणे जपलेला हा सोहळा आता कात टाकून नव्या जोमाने, मोठ्या उत्साहात पंढरीची वारी करुन परतला आहे.
आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, लाल महाल, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. तेथून 'नाम घेता वाट चाली l यज्ञ पाऊला पाऊली l' या भावाने पायी वाटचाल करत पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर दुर्ग तासगाव, दुर्ग सांगली, पन्हाळा, पावनखिंड, विशाळगड, राजगड, प्रचंडगड, सिंहगड, वितंडगड, लोहगड, इंदुरी, संग्रामदुर्ग मार्गाने पुढील साडे दहा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. *शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ११ वे वर्ष तर परंपरेचे ३१ वे वर्ष होते.*
शिवनेरीवरील शिवाई देवीच्या चरणांशी श्रीशिवछत्रपतींच्या पादुका पुन:स्थापित करण्याची सेवेची संधी यावर्षी बारा मावळातील पौड खोऱ्याला व पिंपरी गावाला प्राप्त झाली होती. रणजीत नाणेकर व अजय दूरकर यांच्या नेतृत्वात बालगोपालांच्या गटाने यावर्षीच्या वारीचा समारोप करताना विशेष मेहनत घेतली.
श्रींच्या पालखी सोहळा समापनास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठानचे संदीप ताजणे, हर्षवर्धन कुऱ्हे, अक्षय कुटे, सूरज खत्री, शिवराज संगनाळे यांनी सक्रीय सहभाग घेत परिश्रम घेतले. तर आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी बाबासाहेब जंगले, दाभाडे, जुन्नर पोलीस ठाण्याचे श्री. लोहकरे, विनोद पवार, अमोल शिंदे तसेच श्री शिवाई देवी मंदिराचे पुजारी पुजारी सोपानजी दुराफे, जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रदीप चव्हाण आदि सर्व शासकीय व स्थानिक श्री शिवाई देवी मंदिर संस्थान, कुसूरचे सर्व विश्वस्त आणि कुसूर ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले.
चौकटीत :
शिव-समर्थ भेट सांगलीत पहिल्यांदाच संपन्न
गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर सांगलीच्या कोटणीस आश्रमात यावर्षी पहिल्यांदाच इतिहास घडून समर्थ श्रीरामदास स्वामी महाराजांनी वापरलेल्या पादुकांचा व आषाढी वारी करुन आलेल्या छत्रपती श्रीशिवरायांच्या पादुकांचा अगदी हृद्य भेट सोहळा पार पडला.* श्रीशिवछत्रपतीच्या आषाढी वारीच्या विगत ३१ वर्षांत निरंतर प्रवासात कधीही शक्य न झालेला नवा पायंडा रुजविणाऱ्या या अनुपम सोहळ्यासाठी ह.भ.प संजयबुवा कोटणीस, शिवभक्त बापू हरदास व अवधूत मिरजकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post a Comment
0 Comments