(११ जुलै माता रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड व त्यानंतर ही घडलेल्या असंख्य हत्याकांडाच्या निमित्ताने...)
मित्रा...
चल करूया चर्चा
जाती अंताच्या मुद्द्यांवर
क्रूरतेने ठोकल्या जाणाऱ्या
रक्ताळलेल्या गुद्द्यांवर
बोलशील का काही तू यावर?
तसं ही, तू कधी अशा घटनांवर साधा निषेध सुद्धा नोंदवत नाहीस...
आणि
तुझी माणूस म्हणून असलेली ओळख
कपाळावर सुद्धा गोंदवत नाहीस...
एकेकाळी आपली मैत्री मी जातीपातीला मारक समजत होतो...
'हम सब एक है' चं स्मारक समजत होतो
पण साला सब झूट...
पोटाची आग विझल्यावर
सुस्तावलेल्या
आणि...
चोटाची आग जागल्यावर मस्तावलेल्या रंगेल गप्पांच्या पलीकडे कधी डोकावून बघण्याचा प्रयत्न केला आहेस का?
केला ही असशील म्हणा!
पण दिसली नसेल तुला त्यांच्यात...
तुझी आई
तुझा बाप
तुझी बायको
तुझी बहीण
कुठून आला हा संकुचितपणा?
की लाजतोस व्यक्त व्हायला?
अरे बालवयात बिछाना ओला करण्यापासून...
ते तरुणपणी क्षुल्लक कारणांवरून अबोला धरण्यापर्यंतचा आपला प्रवास...
वैचारिक दृष्ट्या कधी एक झालाच नाही का?
असं असेल तर मी नाकारतो अश्या मैत्रीला...
कारण...
हातातील टाळ बडवत जगणाऱ्या मस्तवाल बडव्यांच्या आणि कडव्यांच्या संगतीला आता माझं ही मन नाही रमत...
तसं ही, मी कधी पाहिलं नाही तुला जयंतीत नाचताना...
की कधी आत्मीयतेने बाबासाहेब वाचताना...
आणि मी बडवत राहिलो टाळ्या
ठोकत आरोळ्या...
जय देव जय देव...
आता मला माझंच हसू येतं कधीतरी...
येथे खरंतर तथाकथित सवर्णांना काहीच फरक पडत नाही...
आणि
सामाजिक बांधिलकीला कितीही जपलं तरी बदल काही घडत नाही...
चल शेवटचं विचारतो माझ्या दोस्ता...
गुप्तांगात घातलेल्या सळ्या
पायाच्या फोडलेल्या नळ्या
आणि
डोक्यात घातलेल्या गोळ्या
अशी आया-बाया माणसांची भोगलेली विद्रुप शरीरं पाहून तुझं मन खरंच सुन्न नाही होत का रे?
की फक्त आपल्याच कुंपणा पर्यंत स्वतःला मर्यादित करून घेतलं आहेस तू कायमच?
या जाती अंताच्या मुद्द्यांवर
आणि...
क्रूरतेने ठोकल्या जाणाऱ्या
रक्ताळलेल्या गुद्द्यांवर
सुमेध वंदना मधुकर सोनावणे
9967162063
*माता रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडातील शहीदांना विनम्र अभिवादन!*
🙏🙏🙏🌷🌷🌷
Post a Comment
0 Comments