Type Here to Get Search Results !

कवी सुमेध सोनवणे लिखित काव्य रचना "धनुर्धारी एकलव्या..."



 धनुर्धारी एकलव्या...


ये महान धनुर्धारी एकलव्या...

असा कसा तू त्यांच्या बोलात फसलास?

स्व कष्टाने मिळवलेली विद्या एका क्षणात गमावून बसलास...


विसरलास का? अर्जुनाला लॅटरल एंट्री देऊन द्रोणाचार्याने तुझी गुणवत्ता जाळली होती...

तरी अशा माणसाला गुरु मानून तू मनुच्या जटात एकप्रकारे फुलेचं माळली होती...


खरं तर अत्त दीपो भव

अर्थात "स्वयं प्रकाशित व्हा"

हा बुद्धांचा उपदेश अंगीकारून तू स्वतःला सिद्ध केले होते...

तरीही तुझं शिष्यत्व नाकारून द्रोणाने सवर्णांनाच प्रतिनिधित्व दिले होते...


चूक तुझीच होती म्हणा...

ज्या विषमतावादी व्यवस्थेवर तीक्ष्ण तिराने प्रहार करायला हवा होतास तो तिरच तू बोथट करून टाकलास...

आणि ज्याने तुला कधी चरणापाशी सुद्धा घेतलं नाही त्याच्याच चरणावर लोटांगण घालायला वाकलास...


तू फक्त तुझा अंगठा नाही कापलास एकलव्या!

तू कापलसं त्या प्रत्येक बंडखोर हातांना ज्यांच्या मुठी अन्यायाविरुद्ध वळत्या झालेल्या... 

न्याय मागण्याच्या भावनेने कळत्या झालेल्या...


आज अनेक मोकाट श्वान भरचौकात भुंकत आहेत...

समतेचे लचके तोडत आहेत...

आता कसं तोंड बंद करणार आहेस तू त्यांचं?

का तुझा आदर्श घेणाऱ्यांनी सुद्धा करावी आपली बोटे पुढे या द्रोणावादी व्यवस्थेसमोर चिरडण्यासाठी?


एव्हना तुझ्या लक्षात आलेच असेल की, का बाबासाहेबांनी संविधानात आरक्षणाची तरतूद केली आहे?

कारण आपली पिढी दर पिढी कर्तबगार असून सुद्धा प्रतिनिधित्व नाकारल्याने गुलामीत गेली आहे...


काही जण तुझी आठवण काढतात गुरु शिष्य परंपरेचे दाखले देताना...की शिष्य असावा तर तुझ्या सारखा!

मला खरंच नाही अप्रूप वाटत त्याच...

उलट चीड येते तुझा रक्ताने माखलेला अंगठा आणि अंधभक्तीने झाकलेला चेहरा पाहून...


ये धनुर्विद्येतील सर्वोच्च ज्ञानी एकलव्या!

तू चुकीचा निर्णय घेऊन जिंकलेली बाजी सुद्धा हरलास...

आणि ज्यांना धनुर्विद्येचा साधा गंधही नव्हता त्यांच्या पुढे अंगठे बहाद्दर ठरलास...

अंगठे बहाद्दर ठरलास...


सुमेध वंदना मधुकर सोनावणे

9967162063

Post a Comment

0 Comments