Type Here to Get Search Results !

शेळी वाटपात हलगर्जीपणा; १४ लाभार्थ्यांचा महामंडळावर अविश्वास, आंदोलनाचा इशारा - प्रदीप गौतम साळवे.



आंबेगाव तालुका (जि. पुणे), दि. ०७ जुलै २०२५:

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी विकास महामंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या (१०+१) शेळी गट वाटप योजनेत मोठा प्रकार समोर आला असून, सदर योजनेत पुरवठा होणाऱ्या शेळ्यांमध्ये दर्जाहीन, आजारी, म्हाताऱ्या व लसीकरण न केलेल्या शेळ्यांचा समावेश असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.


योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शेळ्यांमध्ये गोचीडयुक्त, गर्भधारणेस अयोग्य, दुधाळ नसलेल्या तसेच बोकड लहान व कमकुवत असल्याचे निदर्शनास आल्याने १४ लाभार्थ्यांनी शेळी गट स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे आंबेगाव तालुका महासचिव मा.मधुकर चाबुकस्वार यांनी अधिकृत लेखी तक्रार सादर केली आहे.


या प्रकारामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, योजनेचा हेतूच व्यर्थ जात असल्याचे अनेकांचे मत आहे. यासोबतच शासन निर्णयातील तरतुदीनुसार खुल्या बाजारातून पशुधन खरेदीस अनुमती देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. लाभार्थी स्वतःच्या खर्चाने अनुदानापेक्षा जास्त रक्कम भरण्यास तयार असून, त्यांची लेखी मान्यताही शासनाकडे जमा करण्यात आली आहे.


या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेशजी मोहिते साहेब यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी (कामगार युनियन) चे प्रदेश सदस्य प्रदीप गौतम साळवे यांनी उपायुक्त पशुसंवर्धन (खडकी, पुणे) यांना निवेदन देऊन शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.


या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्‍चित करून लाभार्थ्यांच्या हितासाठी तातडीने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत प्रदीप गौतम साळवे केले व सोबत वंचित बहुजन आघाडी आंबेगाव तालुका अध्यक्ष शिवाजी राजगुरू, जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वावळ, जुन्नर तालुका सचिव राहुल धोत्रे, जुन्नर युवा आघाडी अध्यक्ष महेश पाठारे,महासचिव मधुकर चाबुकस्वार, जुन्नर तालुका वंचित बहुजन आघाडी कामगार उपाध्यक्ष अर्चनाताई काशीकेदार,सीताताई मोरे,संगीताताई मिरके, सुरैया ताई शेख, वंचित बहुजन माथाडी चे आंबेगाव तालुका अध्यक्ष पंकज सरोदे, जुन्नर तालुका अध्यक्ष सागर पवार, देविदास शिशुपाल, रतन साबळे, सुरेश रोकडे, उत्तम वाघमारे, बाळासाहेब वाघ, आशुतोष मोरे, मेहबूब भाई कुरेशी, अविनाश रोकडे, आशुतोष लवांडे, संभाजी राजगुरू,धनेश राजगुरू, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments