काय चाललंय? तुम्ही सर्व एकत्र का जमलात? चला आपापल्या जागेवर जा. संतापाने लालबुंद झालेला आदेश ओरडला.
आदेश, वय वर्ष ५६, गोल्ड मेडॅलिस्ट, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, १० वर्षे या कंपनीत कामाला आणि गेली २ वर्षे जनरल मॅनेजर या सर्वोच्च पदावर. अतिशय अहंकारी आणि माणसापेक्षा मशीन वर जास्त प्रेम करणाऱ्या आदेशवर सर्वांचाच राग होता. कुणाचेही कधीही कौतुक न करणे, सगळ्यांना सतत दबावाखाली ठेवून काम करवून घेणे ही आदेशची माणूसकी शून्य आणि हुकूमशाही कार्यपद्धती कुणालाही आवडत नव्हती.
चंद्रकांत पाटील अर्थात् चंदू. चंदू सबका बंधू. कंपनीच्या स्थापनेपासून कंपनीत काम करणारा एम्पलॅायी नंबर १, अतिशय मनमिळावू आणि सर्वांचा आवडता मोठा भाऊ. आज चंदूच्या सेवानिवृत्तीचा दिवस, ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर.
आज सर्वजण कंपनीत अर्धा तास लवकर आलेत, आपापले काम मोठ्या उत्साहात पूर्ण केले आणि त्याला कारणही तसेच होते आज संध्याकाळी चंदूचा निरोप समारंभ होता आणि नेहमी धमकवणारे आदेश साहेब कंपनीच्या कामासाठी मुंबईला गेले होते.
मीटिंग कॅन्सल झाल्यामुळे आदेश साहेब लवकर परतले आणि त्यांच्या अनपेक्षित येण्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उधळला गेला. साहेब, आज चंदू सरांचा निवृत्तीचा दिवस असल्याने सर्व लोक कंपनीत अर्धा तास लवकर आलेत आणि रोजचे ठरलेले प्रॅाडक्शन झाले आहे, प्रॅाडक्शन मॅनेजरने साहेबांना सांगितले. तरीही, एच आर अॅाफिसर राघवला आदेश साहेबांनी सांगितले की सर्वांचा एक तासाचा पगार कापून घे, अगदी चंदूचा सुध्दा. कंपनीच्या स्थापनेपासून कंपनीत काम करणाऱ्या आणि सर्वांना उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या चंदूला, निवृत्तीच्या दिवशी आदेश साहेबांनी छान बक्षीस दिले होते, निवृत्तीच्या दिवसाचा शेवटच्या तासाचा पगार कापून.
इतरांना सदैव धमकावणाऱ्या आदेशला आज मात्र डॉक्टरांचे बोलणे ऐकायला लागले. अहो तुमचं वजन किती वाढलेय, वजन कमी करा आणि आजपासूनच रोज थोडं झपझप चालत जा, डॉक्टरांनी सांगितले.
आदेश आज घराजवळच्याच एका मैदानात चालायला आला. उद्या कुणाला कसे धमकवायचे, कुणाचा कसा अपमान करायचा, कुणाची कशी जिरवायची हेच विचार आदेशच्या डोक्यात चालू होते. चालता चालता एका खड्ड्यात आदेशचा पाय अडकला आणि आदेश खाली कोसळला. त्याने उठायचा बराच प्रयत्न केला परंतु वाढलेल्या वजनामुळे त्याला उठता येत नव्हते.
मला उठायला मदत करा, मी एका मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर आहे, जनरल मॅनेजर आहे, प्लीज मला मदत करा. आदेश जाणाऱ्या येणाऱ्यांना विनवणी करत होता परंतु कुणीतरी दारुड्या असावा असे समजून आदेशच्या विनवणीकडे सर्वांनी दुर्लक्ष केले.
जॅागिंगसाठी आलेल्या जय आणि विजयला मात्र आदेशकडे दुर्लक्ष करता आले नाही. त्यांनी आदेशला उठायला मदत केली आणि हात धरून चालवायचा प्रयत्न केला परंतु आदेश चालू शकत नव्हता. विजयने पुढे जाऊन रिक्षा आणली आणि त्यानंतर अजय आणि विजयने आदेशला त्याच्या घरी पोहोचविले.
जयने आदेशचा पाय बघितला, विशेष काही नाही, फक्त पाय मुरगळला आहे. काकू आयोडेक्स असेल तर द्या आणि एक ओढणीही द्या, मी काकांच्या पायाला आयेडेक्स लावून त्यावर ओढणी गुंडाळतो, म्हणजे त्यांना आराम मिळून सकाळपर्यंत बरे वाटेल, जय म्हणाला.
नको नको असे काही करू नकोस, जय तुला यातलं काय समजतं? आरती, तू पाटील क्लिनिकला फोन कर आणि डॉक्टरांना बोलावून घे. त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण उपचार करू, आदेशने फर्मावले. आरतीने पाटील क्लिनिकला फोन लावला. रिसेप्शनिस्टने सांगितले, डॉक्टर थोड्या वेळापूर्वीच गेलेत आणि आता ते परत येणार नाहीत. आरतीने खूप विनवणी केली म्हणून रिसेप्शनिस्टने डॉक्टरांचा मोबाईल नंबर आरतीला दिला. आरतीने डॉक्टरांना फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु ऐनवेळी मोबाईलने दगा दिला. बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली होती. शेवटी जयने त्याचा फोन आरतीला दिला आणि आरतीने जयचा फोन वापरून डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांचा फोन सतत बिझी येत होता.
शेवटी आदेश म्हणाला, ठीक आहे जय, अगदी जपून आयोडेक्स लाव. जयने २-३ ठिकाणी पाय दाबला, थोडं चोळलं नी हळुवारपणे आदेशच्या पायाला आयोडेक्स लावले, त्यावरून ओढणी बांधली आणि तो आदेशला म्हणाला, काका आता आराम करा, बरे वाटेल तुम्हाला आणि उद्या ऑफिसला जाण्याआधी तुमच्या त्या डॉक्टरांना जरूर दाखवा. जय आणि विजय जायला निघाले तेवढ्यात आदेश म्हणाला, आरती या दोघांनी खूप मदत केली त्यांना ५०-५० रुपये बक्षीस दे. काका, नको नको. आम्ही जे काही केलं ते फक्त माणुसकी म्हणून. आम्हाला बक्षीस नको. काळजी घ्या आणि गुड नाईट म्हणत जय आणि विजय आदेशच्या घरून निघालेत.
रात्रीतून आदेशचा पाय बरा झाला होता. उगीच रीस्क नको म्हणून पाटील डॅाक्टरांचा सल्ला घेण्यासाठी सकाळीच आदेश "पाटील क्लिनिकमध्ये" दाखल झाला. मॅम मला डॉक्टरांना फक्त दोन मिनिटं भेटायचे आहे, आदेशने रिसेप्शनिस्टला सांगितले. सर, तुमच्या आधी हे पाच पेशंट आलेले आहेत त्यांच्या नंतर मी तुम्हाला सोडेन. साधारणतः तुम्हाला एक तास थांबायला लागेल, रिसेप्शनिस्टने सांगितले. मॅम मला एक महत्त्वाची मीटिंग अटेंड करायची आहे आणि त्याआधी मला डॉक्टरांना भेटायचे आहे. मला डाक्टरांची फक्त दोनच मिनिटे हवीत, आदेशने विनवणी केली. सर तुम्ही मला डिस्टर्ब करू नका. कृपया तुम्ही समोरच्या खुर्चीवर शांतपणे बसा, तुमचा नंबर आला की सांगेन मी, रिसेप्शनिस्टच्या आवाजात कणखरपणा होता.
आदेश साहेब तुम्ही इकडे कसे? आवाज ओळखीचा होता. हो तो आवाज चंदू अर्थात चंद्रकांतचा होता. चंदूला बघून रिसेप्शनिस्ट आदराने उठून उभी राहिली. चंदूचे इथे वजन आहे हे चाणाक्ष आदेशने जाणले आणि चंदूला बाजूला घेऊन आदेश म्हणाला, चंदू मला डॉक्टरांना दोन मिनिटांसाठीच भेटायचे आहे. तुझे वजन वापरून मला डॉक्टरांची लवकर भेट करून दे आणि त्यासाठी बक्षीस म्हणून मी तुला १०० रुपये देईन, आदेश म्हणाला. बहुतेक १०० रुपयांच्या लालचीमुळे चंदू आदेशला डॉक्टरांच्या केबिनकडे घेऊन गेला. डॉक्टरांच्या केबिन मधून कालचा तो तरुण, जय बाहेर आला. जय, अरे तू इथे काय करतोस? तू पाटील डॉक्टरांकडे काम करतोस का? आदेशने आश्चर्याने विचारले. जय, हे माझे साहेब आहेत यांना सर्वतोपरी मदत कर असे म्हणून चंदू निघून गेला.
जयने आदेशला डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेले. केबिनमध्ये कोणीही नव्हते. जय, अरे पाटील डॉक्टरांना लवकर बोलव, मला ऑफिसला जायची घाई आहे, आदेश म्हणाला.
सर, मीच डॉक्टर पाटील, जय पाटील, चंद्रकांत पाटलांचा मोठा मुलगा, नम्रपणे जय म्हणाला. काल मॅम माझ्याच फोनवरून मलाच फोन करत होत्या म्हणून माझा फोन लागत नव्हता.
इतका मोठा डॉक्टर आणि इतका नम्र. काल आपल्याला काहीही कळू न देता त्याने केवढी मदत केली. मी जयला ५० रूपये आणि चंदूला १०० रूपये बक्षिस देऊ केले, आदेश मनातल्या मनात चांगलाच ओशाळला.
आज आदेशच्या निवृत्तीचा दिवस होता. दुपारी बारा वाजताच एच आर ऑफिसर राघवने आदेशला फोन केला आणि सांगितले, सर आज दुपारी दोन वाजता तुमचा लॅपटॉप आणि कारची चावी आम्ही घेऊ. कारमध्ये तुमच्या काही पर्सनल गोष्टी असतील तर प्लीज काढून घ्या. दोन वाजता आदेशकडून लॅपटॉप आणि कारची चावी राघवने घेतली. सर आम्हाला ही केबिन सॅनिटाईज करायची आहे. तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल. सर, विश यू हॅपी रिटायर्ड लाईफ. आयुष्यात प्रथमच आदेशला कोणीतरी आदेश दिला होता.
मोठ्या जड अंतःकरणाने आदेश कंपनीतून बाहेर पडला. त्याने कॅब बुक करायचा प्रयत्न केला परंतु आज कॅब्जचा बंद होता. बस हाच एकमेव पर्याय होता. नाराजीनेच आदेश बस स्टॉप वर पोहोचला. भरमसाठ गर्दी असलेल्या बसमध्ये चढायची आदेशची हिंमत होत नव्हती. आजोबा, तुम्हाला बस पकडायची नसेल तर निदान बाजूला तरी व्हा. तुमच्यामुळे आम्हालाही बसमध्ये चढता येत नाही, एक लहानगा म्हणाला. शेवटी नाईलाजानेच आदेश बसमध्ये चढला.
शिवाजीनगरचे तिकीट द्या म्हणताना आदेशने ५०० रुपयांची नोट कंडक्टर समोर धरली. साहेब, दहा रुपये तिकीट आहे आणि तुम्ही पाचशे रुपयांची नोट देतात माझ्याकडे सुटे नाहीत तुम्ही उतरा बरं बसमधून, कंडक्टर साहेब चिडून म्हणालेत. कंडक्टर काका आजोबांच्या तिकिटाचे हे १० रुपये घ्या आणि आजोबा तुम्ही माझ्या जागेवर बसा, एक शाळकरी मुलगी म्हणाली. आजोबा, मी आदिती. मी तुमच्या बंगल्याच्या जवळच्या दगडी चाळीत राहते. एवढ्या मोठ्या आदेशला आज चाळीतल्या लहान मुलीने न मागताच मदत केली होती.
निवृत्तीनंतर आदेशने २-३ आंतरराष्ट्रीय टूर्स केल्यात. तीन महिन्यानंतर आदेशच्या लक्षात आले की त्याचा एक फोटो अल्बम कंपनीतील त्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये राहिला होता. तो आणण्यासाठी आदेश कंपनीत पोहोचला. सर गेट पास घेतल्याशिवाय तुम्हाला कंपनीत जाता येणार नाही, सिक्युरिटी गार्डने ठणकावून सांगितले. तू मला ओळखले नाहीस का? मी या कंपनीत जनरल मॅनेजर होतो, आदेशने चढ्या आवाजात सांगितले. सर, मी मागच्या आठवड्यातच येथे आलो आणि मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही प्लीज गेट पास घ्या आणि नंतरच आत जा सिक्युरिटी वॉचमनने कडक शब्दात सांगितले.
नाईलाजानेच आदेशने गेट पास घेतला आणि तो कंपनीत शिरला. आदेशचे लक्ष शॅाप फ्लोअरवरील गर्दीकडे गेले. काहीतरी अपघात झाला असावा असे वाटून आदेश शॉप फ्लोअरकडे धावत निघाला. सिक्युरिटी गार्डने आदेशला थांबविले. सर हा बोर्ड बघा, व्हिजिटर्स आर नॉट अलाउड बियॅांड धिस पॅाईंट.
नाईलाजानेच आदेश जागेवरच थांबला. काही वर्षांपूर्वी त्याच्या सूचनेनुसारच तो बोर्ड तेथे लागला होता.
समोरून एच आर ऑफिसर राघव धावत धावत आदेशकडे आला. सर, कसे आहात तुम्ही? इकडे कसे आलात? आणि येताना गेट पास घेतला ना? राघवने विचारले. मी ठीक आहे आणि मी गेट पास देखील घेतला आहे. मला सांग, ही समोर एवढी गर्दी कसली? आदेशने विचारले.
कंपनीतील एका सुपरवायझरला कंपनीत २० वर्षे झालीत म्हणून एक छोटासा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. राघव तो लाल शर्ट घातलेला तरूण कोण? नवीन सुपरवायझर का? सर, ते आमचे नवीन बॉस, वय वर्षे ४०, एम टेक आणि एम बी ए चे गोल्ड मेडॅलिस्ट, सीनियर जनरल मॅनेजर.
सदैव हवेत असणाऱ्या "जनरल मॅनेजर" आदेशची स्वारी आज चक्क जमिनीवर कोसळली होती. नोकरी करताना त्याचा जो वचक होता, मान होता तो केवळ त्याच्या खुर्चीमुळे, पोझिशनमुळे. आयुष्यात काय कमवले होते त्याने? फक्त पैसाच ना?
फोटो अल्बम न घेताच आदेश घरी परतला, "जनरल मॅनेजर" चा मुखवटा कायमचा उतरवून.
-दिलीप कजगांवकर, पुणे

Post a Comment
0 Comments