Type Here to Get Search Results !

मा. आमदार झांबर शेठ यांना...स्मृतीदिनानिमित्त अभिवादन !!

 


सर्वसामान्य शेतकरी आणि माळकरी कुटुंबात जन्मलेले माजी आमदार स्वर्गीय श्रीकृष्ण रामजी तांबे यांचा आज स्मृतिदिन. "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात." या उक्तीप्रमाणे अभ्यासू, हुशार, शांत व निगर्वी असणाऱ्या मुलाचे नेतृत्वगुण, गावकऱ्यांनी अचूक हेरले. आणि गाव कारभाऱ्यांनी दिलेल्या गावातील सरपंच पदापासूनच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. प्रामाणिकपणा, कष्ट आणि विश्वासाच्या नेतृत्वगुणांमुळे गावात आणि तालुक्यात ते "झांबर शेठ" या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतरच्या काळात जुन्नर तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती पद, पुणे जिल्हा परिषदेचे बिनविरोध सदस्य पद आणि जुन्नर तालुक्याचे आमदार पद त्यांनी भूषवले.

१९७२ च्या दुष्काळात आमदारपदी असताना त्यांनी शासनाच्या, 'रोजगार हमी योजनेअंतर्गत' केलेल्या बेजोड कामगिरीमुळे कोपरे मांडवे घाट, लागाचा घाट आणि मुख्यत्वे करून अणे माळशेज घाट तयार झाले. दूरदृष्टी ठेवून जुन्नर तालुक्यात कुकडी प्रकल्पांतर्गत झालेल्या पाच धरणांचे मुख्य श्रेय त्यांनाच जाते. आमदारपदी असताना 'अणे ते माळशेज' या तालुक्यामधील मुख्य रस्त्याचे काम त्याकाळी झाले. आणि हाच रस्ता आता दळणवळणासाठी, ' मुंबई विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग ' असा झाला आहे. १९७० साली उत्तर पुणे जिल्ह्यातील पहिले, 'पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय' त्यांनी ओतूरमध्ये स्थापन केले. यामध्ये त्यांनी स्वतःच्या शेतीवर बँकेचे कर्ज काढले, तर गावकऱ्यांनीही त्यांच्या पाठीशी राहून, आपल्या शेतीच्या जागा योगदान म्हणून स्वखुशीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला दिल्या. त्यांच्यामुळेच आमच्या तसेच, पुढच्या व मागच्या पिढ्यांना उच्च शिक्षण घेता आले. ही मुख्य बाब येथे आवर्जून उल्लेख करावी लागेल.

यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरदचंद्र पवार या सर्व माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पेलल्या. स्वतःच्या धाडसी, हुशारी या नेतृत्वगुणांनी अगदी सोन्यात रूपांतरित केल्या. गावकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहिल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना कायमच पाठिंबा दिला. दळणवळण, पाणी आणि शिक्षण या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांच्या यशस्वी आमदारकीची कारकीर्द प्रचंड गाजली. जुन्नर तालुका सुजलाम सुफलाम करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जुन्नर तालुक्याचे ते भाग्यविधाते ठरले. साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि सर्वोच्च नेतृत्व गुण यांच्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावागावात आणि मनामनात आजही त्यांच्या स्मृतीचे आदराचे स्थान आहे. कर्तृत्वाने माणूस सिद्ध आणि मोठा होतो. त्यांचे कर्तृत्वच इतके आफाट होते की... अणे गावापासून ते माळशेज घाट पट्टा, कोपरे, मांडवे या आदिवासी आणि मढ परिसरात, आजही... ते गेल्यानंतरच्या ५० वर्षानंतर, घराघरांमध्ये त्यांचे फोटो मानाच्या स्थानी पाहायला मिळतात. पांढरा शर्ट, पायजमा व टोपी असा पेहराव असलेल्या साध्या राहणीचा, उच्च विचारसरणीचा आणि कर्तृत्ववान माणूस आपल्या जुन्नर तालुक्याला आमदार म्हणून लाभला होता. हे आपले परमभाग्यच आहे. ओतूरकरांना तर त्यांचा अभिमानच आहे. त्यांच्या अमर्याद कर्तृत्वाची आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाची स्मृती कायमच काळजावर कोरलेली राहील. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!! 🙏🙏


दिव्यत्वाची जेथे प्रचिती,

तेथे... कर माझे जुळती...


_डॉ. प्रवीण डुंबरे, ओतूर (पुणे )_

Post a Comment

0 Comments