आज असंच अचानक एका प्राथमिक शाळेत शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी जायचा योग आला. मी शाळेत पोहोचलो, तेव्हा नेमकी सुट्टीची वेळ झाली होती. काही मुलांचे पालक शाळेच्या गेटवर उभे होते. मी एकाला विचारलं, "शाळा सुटली का?" तर तो म्हणाला, "हो, सुटेल पाच मिनिटांत."
मला अर्ज द्यायचा होता, म्हणून मी पटकन आत शाळेमध्ये शिरलो. एका मॅडमना विचारलं, "मुख्याध्यापकांचं ऑफिस कुठे आहे?" त्यांनी सांगितलं, "वर जा, पहिल्या मजल्यावर. त्या त्या सरांना भेटा."
मी पहिल्या मजल्यावर जात होतो, तर पायर्यांवर एक छोटा मुलगा दिसला. मी विचारलं, "अरे, हे सर कुठे आहेत रे?"
तो लगेच म्हणाला, "बाबो! ते सर खूप डेंजर आहेत!"
त्याचं ‘डेंजर’ म्हणणं ऐकून मी थोडा थबकलो. विचारलं, "का रे? काय झालं?"
तो म्हणाला, "इथे… इथे हातावर मारतात… बेंचवर उभं करतात!"
मी परत विचारलं, "का रे?"
तो म्हणाला, "अभ्यास नाही केला की मारतात!"
मला माझ्या शाळेचे सर आठवले. आम्हालाही त्यांची भीती वाटायची, त्यांच्या शिस्तीची दहशत होती.
पण त्या मुलाच्या बोलण्यातही तशीच भीती होती — मात्र त्यामागे लपलेली निरागसता, आणि नकळतपणे उमगलेली जबाबदारीसुद्धा जाणवत होती.
खरंच, पूर्वी शिक्षक मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा करत, मारतही.
तेव्हा वाटायचं, की ते खूप कठोर आहेत… पण आता कळतं की त्यांचा हेतू वेगळाच होता — मुलं चांगली घडवण्याचा.
तेव्हा जी भीती वाटायची, आज त्याच शिक्षकांबद्दल आपोआपच आदर वाटतो.
इतक्यात बेल वाजली.
मुलं वर्गातून धावून बाहेर येऊ लागली. एक गोंधळ, धावपळ, आनंद, आरोळ्या…
पण त्यातच एक वेगळीच मजा होती.
घरी जायची गडबड, आणि चेहऱ्यावर निरागस हास्य.
हेच बालपण.
एकदा गेलं की पुन्हा मिळणार नाही…
शाळा सुटण्याची बेल…
आपल्याही वेळी शाळा सुटली की जो आनंद व्हायचा, तो शब्दांत मांडणं खरंच अशक्य आहे.
शिक्षक आजही मुलांना शिस्त लावण्यासाठी ओरडतात, शिक्षा करतात.
पण त्यांच्या मनात कोणतीही दुश्मनी नसते — उद्देश एकच असतो — "माणूस घडवणं."
आणि मलाही असंच वाटतं की शिक्षणाचा खरा हेतू म्हणजे फक्त परीक्षेत गुण मिळवणं नव्हे, किंवा मोठी पगाराची नोकरी मिळवणं नव्हे —
तर माणूस घडवणं.
तुम्ही किती शिकला, कुठे पोचलात, यापेक्षा —
"तुम्ही माणूस म्हणून किती समृद्ध आहात?"
हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
आज सत्य बोलणारे, प्रामाणिकपणावर ठाम राहणारे, नैतिक मूल्ये जपणारे लोक शिक्षणव्यवस्थेतून निघून चालले आहेत.
आणि जे थोडेफार शिल्लक आहेत, त्यांना ‘अव्यवहारी’ समजून समाजच वेडे ठरवत आहे.
कोणत्याही पालकाला विचाराल की, "तुमचं मूल पुढे जाऊन काय व्हावं वाटतं?"
तर प्रत्येक वेगवेगळं उत्तर देईल — डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी वगैरे.
पण "माझं मूल एक चांगलं माणूस व्हावं," असं उत्तर फारच कमी जण देतील.
कारण आजच्या व्यवहाराच्या जगात, माणूसपणा, नैतिकता, भावनिक नाती जपणं याला प्राथमिकता नाही राहिली.
असो.
मी नंतर त्या शाळेतील शिक्षकांना भेटलो, अर्ज दिला आणि परतलो.
पण खरंच…
त्या शाळेत जाऊन मन प्रसन्न झालं.
क्षणभर का होईना, पण स्वतःचं बालपण परत भेटायला आलं.
जुने दिवस आठवले, आणि मनात एक सुंदर समिश्र भावना जागी झाली — जिथे हास्य होतं, आठवणी होत्या, आणि एक नॉस्टॅल्जिक शांतता होती…
लेखक - सुनिल गायकवाड
संपर्क - +91 99705 62229

Post a Comment
0 Comments