Type Here to Get Search Results !

गणेशोत्सव मंडळाचा आगळावेगळा उपक्रम “नवदुर्गांचे शैक्षणिक पालकत्व”.....



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या परंपरेत यंदा गवत बाजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जुन्नर यांनी नवीन पाऊल टाकले असून गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च कमी करून काही हुशार, कल्पक व गरजू मुलींना शैक्षणिक दत्तक घेतले असून त्यांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र सुकाळे यांनी दिली.

“गणेशोत्सव म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे व्यासपीठ आहे. मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक करणे म्हणजे उज्ज्वल समाजाची पायाभरणी असून इतर मंडळांनी हा आदर्श घ्यावा असे मत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांनी व्यक्त केले. 

कृष्णाराव मुंढे विद्यालयातील 15 गरजू व गरीब विद्यार्थिनींचे शैक्षणिक पालकत्व मंडळाने स्वीकारले असून सर्व मुलींना शैक्षणिक किटचे वाटप करण्यात आले. एकल पालकत्व असलेल्या मुलींना “नवदुर्गा” मानून त्यांचा सांभाळ करण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. शालेय साहित्य, शालेय फी, तसेच जीवन आवश्यक काही वस्तू आणि वर्षभर आवश्यक मार्गदर्शन यांची जबाबदारी मंडळाकडून उचलण्यात येणार असल्याचे अध्यक्ष दुर्गेश जोशी यांनी सांगितले. 

याप्रसंगी या उपक्रमामुळे मुलींना नवे बळ मिळेल आणि समाजात शिक्षणाबद्दल जागृती निर्माण होईल, असा विश्वास संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा मुंढे यांनी व्यक्त केला व मंडळाचे आभार मानले. सदर कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे, रोटरी क्लब ऑफ जुन्नरचे माजी अध्यक्ष धनंजय राजुरकर, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र सुकाळे ,मंडळाचे अध्यक्ष दुर्गेश जोशी ,माजी नगरसेवक नरेंद्र तांबोळी ,सिद्धांत लोणकर ,सोनू मुसळे ,शुभम जगदाळे ,राम जोशी ,मयूर कुलकर्णी ,मयूर संभूस ,गौरव राणे ,विकी सोनवणे ,ओंकार मडके आदींसह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments