जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमशेत येथे “दप्तरमुक्त आनंददायी शनिवार” अंतर्गत “खाऊ गल्ली” हा नवोपक्रम उत्साहात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारून छोटेखानी बाजारपेठच उभी केली. या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित महिलांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर कुमशेत गावचे सरपंच रवींद्र मधुकर डोके यांच्या हस्ते रिबन कापून “खाऊ गल्ली”चे उद्घाटन करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अथर्व डोके यांचे बॉबी व गोळ्यांचे दुकान, शिवांश डोके यांचे कोकम ज्यूस, साई गणेश डोके यांचे भजी-पाव, ईश्वरी शेलार हिची ज्ञानेश्वरी ओळी भेळ, वेदश्री डोके हिचा खमंग ढोकळा, आली इमामदार यांचे खाऊ, स्वरा डोके हिचे सँडविच, रिया दुधाळ हिचे खाऊ, आरोही भगत हिचा ढोकळा, विराज डोके यांचे वेफर्स व पाणी बॉटल, कृष्णा डोके यांचे वडापाव सेंटर, पर्णवी डोके ज्यूस सेंटर, विराज वाणी इडली सेंटर, समर्थ वाणी ज्यूस सेंटर, ओवी डोके मसाला पापड, मानसी वाणी समोसा, रुद्र डोके चाट कॉर्नर, आरुष डोके कोकम सरबत, तनुज डोके पॉपकॉर्न, देवांश डोके पाणीपुरी, शंतनू डोके वडापाव व चहा, तर प्रसाद डोके यांची ओली भेळ असे अनेक आकर्षक स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले.
विद्यार्थ्यांनी स्वतः पदार्थ विक्री करून सुमारे सात हजार रुपयांची कमाई केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, पैशाचे नियोजन, ग्राहकांशी संवाद आणि स्वावलंबनाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकता आले. विद्यार्थ्यांच्या पदार्थ तयारीत पालक—विशेषतः आई-वडिलांचा मोलाचा वाटा होता.
या प्रसंगी व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशितोष दिलीप डोके, उपाध्यक्ष शिवकन्या वाणी, ग्रामपंचायत सदस्य राजेश डोके, बँक मॅनेजर सत्यवान डोके, बँक मॅनेजर शिवाजी हरिभाऊ डोके, कृषी सहकारी संस्थेचे संचालक पांडुरंग बबन डोके यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि उद्योजकतेची बीजे पेरली जातात, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्याम लोलापोड सरांनी केले व त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शेवटी मुख्याध्यापक यशवंत घोडे सरांनी उपस्थित मान्यवर, पालक व ग्रामस्थांचे आभार मानले.
“खाऊ गल्ली” या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात नवे चैतन्य निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत जीवनातील व्यवहारज्ञान देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.




Post a Comment
0 Comments